रणरागिणी वक्तृत्व स्पर्धा; तीन गटांसाठी 40 स्पर्धक

केतन गुप्ता, अदिती पाटील अन् आराध्य पाटील प्रथम

| रायगड । प्रतिनिधी ।

माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धेमध्ये रणरागिणी मीनाक्षीताई पाटील यांचा जीवनपट उलगडणारी भाषणे झाली. चिमुकल्यांपासून ज्येष्ठ वक्त्यांपर्यंत सर्वांनीच मीनाक्षीताई पाटील यांचा संघर्षरूपी यशस्वी प्रवास उपस्थित श्रोत्यांसमोर मांडला. वक्त्यांच्या यशस्वी सादरीकरणामुळे परीक्षकांनादेखील गुण देताना भाषणांमधील बारकावे तपासावे लागले. अटीतटीच्या या स्पर्धेत खुल्या गटामध्ये केतन गुप्ता, मध्यम गटामध्ये अदिती पाटील आणि कनिष्ठ गटामध्ये आराध्य पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

माजी राज्यमंत्री मीनाक्षीताई पाटील यांची 77 वी जयंती पेझारी येथे संपन्न झाली. यावेळी मीनाक्षीताई पाटील यांचा जीवनपट उपस्थितांसमोर मांडणारी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार पंडित पाटील यांच्या उपस्थितीत पार पडले. या स्पर्धेसाठी देण्यात आलेल्या विषयांवर तीन गटात विभाजित केलेल्या स्पर्धकांनी मीनाक्षीताई यांच्यावरील शब्दबद्ध जीवनपट सादर केला आणि उपस्थितांकडून वाहवा मिळवली. या स्पर्धेतील वक्त्यांची भाषणे ऐकून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी माजी आमदार पंडित पाटील, माजी नगराध्यक्ष सुनीता नाईक, रायगड जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अ‍ॅड आस्वाद पाटील, शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे, रायगड जिल्हा परिषद माजी अर्थ बांधकाम सभापती चित्रा पाटील, रायगड जिल्हा परिषद माजी सदस्य भावना पाटील, साधना पाटील, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, ज्येष्ठ विधिज्ञ अ‍ॅड. सचिन जोशी, सुरेश घरत, माजी नगरसेवक अनिल चोपडा, माजी नगरसेविका वृषाली ठोसर, माजी नगरसेविका संजना किर, कुंदा गावंड, जगन्नाथ पाटील, अनिल पाटील, सुरेश म्हात्रे, अशोक कुकलारे, सुदिन कांबळे, समीर अधिकारी, प्रशांत काळे, श्रीकांत पाटील, विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी, विद्यार्थी उपस्थित होते.

नारायण नागु पाटील यांनी शेतकर्‍यांची चळवळ उभी केली. त्याचे प्रमोशन शेतकरी कामगार पक्षाने केले पाहिजे. शेतकर्‍यांना न्याय देणार्‍या नारायण नागु पाटील यांची जयंती आणि पुण्यतिथी राज्यस्तरावर व्हायला हवी, त्यांच्या लढ्याचा इतिहास आजच्या तरुण पिढीला समजला पाहिजे. लाल बावटा संघर्षाचा ध्वज आहे. संघर्षाने मिळविलेले यश चिरकाल टिकते हा इतिहास आहे. शेतकरी आणि कामगारांसाठी चरीचा संप पुकारून शेतकर्‍यांचे नेतृत्व करणारे पाटील कुटुंबीय आजही शेतकर्‍यांसाठी संघर्ष करीत आहे. या डाव्या विचारांच्या पक्षाचे नेतृत्व करणार्‍या रणरागिणीची म्हणजेच मीनाक्षी पाटील यांची आज जयंती आहे. या झुंजार नेतृत्वाचे विचार जनमानसात पोहोचविण्यासाठी चित्रा पाटील यांनी केलेले वक्तृत्व स्पर्धेचे नियोजन उत्तम आहे. परंतु, मीनाक्षी पाटील यांचे विचार देशपातळीवर पोहोचविण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने प्रयत्न करायला हवेत असे माजी आमदार पंडित पाटील म्हणाले.

शेतकरी कामगार पक्षाचे स्थान देशपातळीवर आजही अबाधित आहे. शेतकर्‍यांच्या संपाने रायगडसह देशाच्या राजकारणाला नारायण नागू पाटील हे संघर्ष योद्धे लाभले. त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन संपूर्ण महाराष्ट्र त्यावेळी पेटून उठला होता. नानासाहेबांनंतर दत्ता पाटील, प्रभाकर पाटील, मीनाक्षी पाटील, जयंत पाटील, पंडित पाटील आणि मीनाक्षी पाटील अशी संघर्षाची ज्योत तेवत ठेवणारी नेतृत्वं लाभली. त्यांच्यापाठोपाठ चित्रलेखा पाटील, चित्रा पाटील आणि अ‍ॅड. आस्वाद पाटील यांनी संघर्षांच्या ज्योतीला मशाल बनविले आहे. राजकारणामधून समाजकारण साधण्याचा प्रयत्न शेतकरी कामगार पक्षाने अविरतपणे केला आहे. मीनाक्षी पाटील यांच्या वैचारिक बैठकीमधून आम्ही आमची राजकीय कारकीर्द सुरु केली आहे. परखड आणि अर्थपूर्ण बोलण्याची कला शिकल्यामुळे आज राजकीय, सामाजिक आणि विधी क्षेत्रात सक्षमपणे नेतृत्वधारी बनण्याची संधी मिळाली. मीनाक्षी पाटील यांचे विचार महाराष्ट्रातील आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे यांनी सांगितले.

पेझारी येथे आयोजित करण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेसाठी 40 स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदविला. यामध्ये कनिष्ठ गटामध्ये आराध्य पाटील यांनी प्रथम, लाजरी पाटील यांनी द्वितीय, प्रचिती वाघमारे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. मध्यम गटात अदिती पाटील प्रथम, मनस्वी पाटील द्वितीय, पूर्व पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला. खुल्या गटामध्ये केतन गुप्ता प्रथम, वैशाली पाटील द्वितीय आणि संतोष आंबेतकर यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

Exit mobile version