रानसई धरण अखेर ओव्हर फ्लो

उरणकरांची पाण्याची चिंता मिटली

| उरण | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील दोन लाख नागरिकांना पाणीपुरवठा करणारे रानसई धरण रविवारी (दि.5) रात्री एकच्या सुमारास ओव्हर फ्लो होऊन वाहू लागले आहे. मागील पाच दिवसांपासून कोसळणारे आणि डोंगर माथ्यावरून येऊन थेट धरणात मिळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे धरण दुथडी भरून वाहू लागले आहे. मागील वर्षीही 18 जुलै रोजीच धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याची माहिती उरण एमआयडीसीच्या कार्यालयातून देण्यात आली. मात्र, यावर्षी अवघ्या पाच दिवस कोसळणाऱ्या पावसात रानसई धरण ओसंडून वाहत असल्याने उरणकरांची पाण्याची चिंता मिटली आहे.

उरण तालुक्यातील रानसई या धरणातून तालुक्यातील 25 गावे, उरण शहर आणि काही औद्योगिक विभागासह सुमारे दोन लाख लोकसंख्येच्या उरण परिसराला रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जून महिना जवळपास पुरता कोरडाच गेला होता. पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र त्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच धरणक्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळी सातत्याने वाढत चालली होती. त्यातच डोंगर माथ्यावरून येऊन थेट धरणात मिळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे रविवारी रात्री 1 वाजल्यापासून धरण दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे उरणकरांची पाणी टंचाईचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. एकंदरी रानसई धरण ओसंडून वाहत असल्याने पर्यटकांनी तसेच तरुणांनी धरण परिसरात जाऊ नये, असे आवाहन एमआयडीसीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

Exit mobile version