| उरण | वार्ताहर |
तालुक्यातील दोन लाख नागरिकांना पाणीपुरवठा करणारे रानसई धरण मंगळवारी पहाटेच्या सुमारास ओव्हर फ्लो होऊन वाहू लागले आहे. मागील काही दिवसांपासून कोसळणारा पाऊस आणि डोंगर माथ्यावरून येऊन थेट धरणात मिळणाऱ्या पाण्यामुळे धरण दुथडी भरून वाहू लागले आहे. मागील वर्षी 18 जुलै रोजी धरण पूर्ण भरले होते. यावर्षीही 18 जुलै रोजी धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याची माहिती उरण एमआयडीसीकडून देण्यात आली आहे.
उरण तालुक्यातील 25 गावे, उरण शहर आणि ओएनजीसी, एनएडीसह इतर औद्योगिक विभागासह सुमारे दीड लाख लोकसंख्येच्या उरण परिसराला रानसई धरणातून पाणीपुरवठा केला जातो. जून महिना जवळपास पुरता कोरडाच गेला होता. पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच धरणक्षेत्रात कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत चालली होती. त्यातच डोंगर माथ्यावरून येऊन थेट धरणात मिळणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे मंगळवारी (दि.18) पहाटे चारच्या सुमारास धरण दुथडी भरून वाहू लागले आहे. त्यामुळे उरणकरांचे पाणीटंचाईचे संकट दूर झाले असल्याची माहिती उरण एमआयडीसीकडून देण्यात येत आहे.