25 गावांना धरणातील पाण्याचा पुरवठा; दहा एमसीएम इतके पाणी साठवण क्षमता
| उरण | वार्ताहर |
महाराष्ट्र शासनाने एमआयडीसीच्या माध्यमातून उरण तालुक्यात रानसई या धरणाची उभारणी केली. यासाठी रानसई, विंधणे, आणि चिरनेर ग्रामपंचायत हद्दीतील शेतकऱ्यांच्या जमिनी 1970 साली संपादित करण्यात आल्या. रानसई या आदिवासीवाडी जवळील डोंगर परिसरात 1970 ते 81 या कालावधीत 236.76 मीटर लांब व 14 मीटर खोली, तसेच 15 दरवाजे असणाऱ्या पाणलोट क्षेत्रातील धरणाची संरक्षक भिंत उभी केली आहे. 350 एकर क्षेत्रात हे धरण आहे. यात 10 एमसीएम इतके पाणी साठवले जाते. ओएनजीसी, एनऐडी, भारत पेट्रोलियम, महावितरण कंपनी, उरण शहर तसेच तालुक्यातील 25 गावातील जनतेला या धरणातील पाण्याचा पुरवठा करण्यात येतो.
यावर्षी 18 जुलै रोजी सततच्या पडणाऱ्या पावसामुळे ओव्हर फ्लो होऊन वाहू लागले आहे. मात्र धरणातून वाहणाऱ्या धारांमुळे धरणातील संरक्षण भिंतींला केलेले प्लास्टर हे ढासळू लागले आहे. त्यामुळे संरक्षण भिंतीच्या लोखंडी जाळ्या, सलई या उकडून प्लास्टर बरोबर खाली पडू लागल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. या अगोदर ही 2 जुलै 2019 मध्ये धरण ओव्हर फ्लो होऊन वाहू लागले असतानाही धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील संरक्षण भिंतींचे प्लास्टर अशा प्रकारे ढासळल्याची घटना घडली होती. तशा प्रकारची घटना पुन्हा एकदा यावर्षी 18 जुलै रोजी झालेल्या पावसामुळे झाली आहे.
एकंदरीत संबंधित ठेकेदारांनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील संरक्षण भिंतींच्या प्लास्टरचे काम हे निकृष्ट दर्जाचे केले असल्यामुळेच हे प्लास्टर ढासळू लागले आहे. त्यामुळे धरणाच्या संरक्षण भिंतीच्या लोखंडी जाळ्या, सळ्या बाहेर आलेल्या आहेत असे येथील कामगार वर्गाकडून सांगण्यात येत आहे. तरी एमआयडीसीच्या वरिष्ठ अधिकारी वर्गाने धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील संरक्षण भिंतींच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची पाहणी करून दोषी कंत्राटदारावर व संबंधित अधिकारी वर्गावर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.