मतिमंद मुलीवर बलात्कार; आरोपीला वीस वर्षाचा कारावास

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील पोयनाड विभागातील वीस वर्षीय मतिमंद मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपी भालचंद्र शंकर म्हात्रे यास वीस वर्ष कारावासाची शिक्षा व 50 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

न्यायाधीश-3 श्री. एन. के. मणेर यांनी हा महत्वपुर्ण निकाल दिला. या खटल्यात शासकीय अभियोक्ता भुषण साळवी यांनी सरकारपक्षातर्फे न्यायालयसमोर युक्तिवाद केला.हा गुन्हा जानेवारी 2017 दरम्यान रायगड जिल्ह्यातील पोयनाड विभागात घडला. या प्रकरणातील आरोपी भालचंद्र शंकर म्हात्रे याने दिव्यांग पिडीता मुलगी ही घरकाम करीत असताना मतिमंदपणाचा गैरफायदा घेत स्वतःच्या घराच्या माळयावर नेवून, तिच्यावर अत्याचार केला. याप्रकरणी पोयनाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानूसार पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले.

याप्रकरणी यायालयाने आरोपी भालचंद्र शंकर म्हात्रे यास दोषी पकडून 20 वर्षाची शिक्षा व 50 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. या प्रकरणात पोयनाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. एल. शेवाळे व त्यांच्या सहकार्‍यांनी जलदगतीने तपास पूर्ण करून मोलाचे सहकार्य केले.

या खटल्यात शासकीय अभियोक्ता भुषण साळवी यांनी एकूण 13 साक्षीदार तपासून युक्तिवाद केला. यामध्ये फिर्यादी, स्वतः पिडीता, डॉ. बी. वाय वायंगणकर, साक्षीदार नैनिता लक्ष्मण पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जी. एल. शेवाळे यांची साक्ष न्यायालयात महत्वपूर्ण ठरली. तसेच पैरवी कर्मचारी पोलीस हवालदार सचिन खैरनार, पोलीस हवालदार राजेश नाईक, महिला पोलीस शिपाई ए.एच.म्हात्रे पोलीस शिपाई पाटिल यांचे सहकार्य मोलाचे ठरले.

Exit mobile version