। रसायनी । वार्ताहर ।
यशवंती हायकर्स या गिर्यारोहण संस्थेच्या माध्यमातून रायगड पोलीस दलातील महिला-पुरुष अधिकारी व कर्मचारी यांना दिलेले रॅपलिंगचे प्रशिक्षण हे प्रेरणादायी आहे. यासारखे साहसी प्रशिक्षण महाराष्ट्रातील सर्व पोलिसांना मिळणे गरजेचे आहे. त्यातून शारीरिक स्वस्थतेबरोबरच सर्व परिस्थितीत आम्ही साहसाने सामना करू शकतो ही मनोभूमिका देखील तयार होते, असे उद्गार राष्ट्रीय तपास संस्थेचे पूर्व विशेष पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांनी कले आहे. ‘सामर्थ्य शब्दांचे’ या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ पत्रकार राजीव मुळेकर यांनी यशवंती हायकर्स व रायगड पोलीस दलातील विरांगनांचा कौतुक सोहळा खालापूर पंचायत समिती येथे आयोजित केला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलतातना अतुलचंद्र कुलकर्णी यांनी उपस्थित असलेल्या एन.सी.सी.च्या मुलींनी एनडीएमध्ये प्रवेश घ्यावा, तसेच भविष्यामध्ये सैन्यदलामध्ये दाखल होण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. दरम्यान, राजीव मुळेकर यांनी तयार केलेल्या रॅपलिंग प्रशिक्षणाच्या ‘कठीण वज्रास भेंदू ऐसे’ या सचित्र पुस्तिकेचे प्रकाशन अतुलचंद्र कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर राजीव मुळेकर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यामागची संकल्पना उपस्थितांसमोर कथन केली. यशवंती हायकर्सचे माजी अध्यक्ष महेंद्र भंडारे यांनी संस्थेचा इतिहास उपस्थितांसमोर मांडला. रायगड पोलीस उप अधीक्षक अभिजीत शिवथरे यांनी रायगड मधील महिला पोलिसांनी रॅपलिंगचे प्रशिक्षण घेतल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केले. तसेच, सर्व पोलिसांसाठी अन्य प्रशिक्षण देण्याचीही योजना असल्याचे सांगितले. गुप्तचर यंत्रणा प्रमुख गीता चव्हाण यांनी अशा प्रकारचे साहसी प्रशिक्षण पोलिसांसाठी उपयुक्त असून भविष्यात काम करताना त्याचा त्यांना निश्चितच उपयोग होणार असल्याचे सांगितले. यावेळी व्यासपीठावर राज्य गुप्तचर नियंत्रण नाशिक विभागाच्या उपायुक्त गीता चव्हाण, रायगडचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अभिजीत शिवथरे, विभागीय पोलीस अधीक्षक विक्रम कदम व ज्येष्ठ पत्रकार राजीव मुळेकर आदह मान्यवर उपस्थित होते.