आमदार चषकावर रासळ संघाची मोहोर

| पाली | वार्ताहर |

भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा व सन्मान फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सुधागड तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने सुधागड तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा उत्साहात पार पडली. ही स्पर्धा रविवार, 30 एप्रिल रोजी कॉम्रेड गोदुताई परुळेकर मैदान, सिद्धेश्‍वर तलावाजवळ, चंदनवाडी ठाणे येथे आयोजित करण्यात आली होती. अंतिम सामन्यात जय हनुमान रासळ संघाने वरदायिनी राबगाव संघाचा पराभव करीत आमदार कबड्डी चषकावर मोहोर उमटविली.

या स्पर्धेत तालुक्यातील 26 संघांनी आपला प्रवेश नोंदवला होता. या स्पर्धेतील अंतिम विजयी संघ जय हनुमान रासळ, उपविजेता वरदायिनी राबगाव, तृतीय क्रमांक शिव संग्राम पाली, चतुर्थ क्रमांक भैरवनाथ वावे संघाने पटकाविला. या स्पर्धेतील शिस्तबद्ध संघ वाघेश्‍वर आंबिवली, सर्वोत्कृष्ट खेळाडू नितेश लहाने (रासळ), उत्कृष्ट चढाई अजिंक्य मोरे (राबगाव), उत्कृष्ट पक्कड दिपेश लहाने (पाली), पब्लिक हिरो विशाल मस्के (वावे) या खेळाडूंना मंडळाच्या वतीने आकर्षक बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

ठाणे शहर विधानसभा आमदार संजय केळकर व भाजपा ठाणे शहर (जिल्हा) अध्यक्ष तथा आमदार निरंजन डावखरे यांच्या मार्गदर्शनाखाली सन्मान फाऊंडेशनचे अध्यक्ष रमेश सागळे यांच्यावतीने या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमासाठी सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ, ठाणे अध्यक्ष विठ्ठल घाडगे व संयोजक कार्याध्यक्ष प्रकाश शिलकर, क्रीडा समितीप्रमुख राकेश थोरवे, चिटणीस अविकांत साळुंखे, जयगणेश दळवी, सुधीर नेमाणे, अजित सागळे, धनंजय खाडे, सुनिल तिडके यांच्यासह तालुक्यातील ठाणे, रायगड जिल्ह्यातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित होती. या स्पर्धेचा थरार पाहण्यासाठी ठाण्यातील सुधागड तालुकावासी आणि ठाणेकर नागरिकांनीही गर्दी केली होती. स्पर्धेचे समालोचन राकेश थोरवे, अलंकार मनवी, संजय जैन यांनी केले.

Exit mobile version