रसायनीत माती चोरांचा सुळसुळाट

महसूल विभागाची धडक कारवाई; 13 लाखांचा मुद्देमाल जप्त

| रसायनी | प्रतिनिधी |

रसायनीतील खाने-आंबिवली परिसरात एचओसी कंपनीच्या पराडे हद्दीतील जागेत माती चोरीचा विषय चर्चेत होता. रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात ही मंडळी डंपर आणि जेसीबी घेऊन माती उकरत होती. याबाबत स्थानिक नागरिकांनी तहसिलदारांकडे तक्रार केली होती. त्याची दखल घेत निवासी नायब तहसीलदार सुधाकर राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल मंडळ अधिकारी श्रीनिवास खेडकर व ग्राम महसूल अधिकारी बलभिम लाटे यांनी फिरते तपासणी पथक घेऊन रात्रीच्या सुमारास घटनास्थळी जाऊन पाहणी करताच त्याठिकाणी मातीची चोरी सुरू असल्याचे दिसून आले.

पराडे कॉर्नरच्या सर्वे नंबर 41/1 मध्ये खुलेआम माती चोरी होत असल्याचे महसूल अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी, परवाना आहे का? असे विचारले असता, त्यांनी परवाना नसल्याचे सांगितले. त्यानंतर लगेच महसूल मंडळ अधिकारी श्रीनिवास खेडकर आणि ग्राम महसूल अधिकारी बलभिम लाटे यांनी जेसीबी व डंपर रसायनी पोलीस ठाण्यात घेऊन गेले व रितसर तक्रार दाखल केली. त्यात 8 लाख रुपये किमतीच्या जेसीबी कंपनीची बकहो लोडर मशिन, 5 लाख रुपये किमतीचा टाटा कंपनीचा हायवा डंपर, तसेच डंपरमधील 7200 रुपये किमतीची माती असा एकूण 13 लाख 7 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात वावेघर येथील सुजित विठ्ठल माळी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version