| रसायनी | वार्ताहर |
कोन-रसायनी आणि दांड-रसायनी रस्त्याच्या काही रहदारीच्या ठिकाणी काँक्रिटीकरण करुन रस्त्याच्या साईडपट्टीला भराव करुन डांबर टाकली जात आहे. पाऊस जोरात झाल्याने ही डांबर साईडपट्टीवरुन निघून जात आहे. रस्त्यालगत पाणी साचलेल्या जागेवर खडी व डांबर टाकून काम सुरु असल्याने रसायनीकर संताप व्यक्त करीत आहेत. भरपावसात रस्त्याचे काम व साईडपट्टी टिकणार कशी, असा सवाल रसायनीकर करत आहेत.
रसायनी पाताळगंगा औद्योगिक परिसर असल्याने शेकडो अवजड वाहनांची रेलचेल कोन-रसायनी आणि दांड-रसायनी या रस्त्यांवरुन सुरु असते. याअगोदर या रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने रसायनीकरांना खड्ड्यांतून प्रवास करावा लागत होता. यावेळी पत्रकार संघटना, सामाजिक संस्था तसेच सर्वपक्षीयांनी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विरोधात आवाज उठविताच स्थानिक लोकप्रतिनिधींनी रस्त्याच्या कामासाठी निधीची पूर्तता केली. सध्या या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात असून, पूर्णत्वास होण्याच्या मार्गावर आहे.