। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
अफगाणिस्तानचा स्टार अष्टपैलू खेळाडू राशिद खान याने झंझावाती खेळी करत अफगाणिस्तान टी-20 लीगमध्ये राशिदच्या जोरदार फटकेबाजीने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. परंतु, टायगर्स संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. फजलहक फारुकीच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर अमो शार्क्सने 26 धावांनी हा सामना जिंकला. फारुकीने 13 धावांत पाच बळी घेत सामन्याचा निकाल फिरवला.
प्रथम फलंदाजी करणार्या शार्क संघाने निर्धारित 17 षटकांत 3 बाद 166 धावा केल्या. पावसाच्या व्यत्ययामुळे टायगर्सना 12 षटकांत 139 धावांचे लक्ष्य मिळाले. परंतु, त्यांना 9 बाद 112 धावाच करता आल्या. दरम्यान, संघाची 5 बाद 20 धावा अशी दयनीय अवस्था झालेली असताना राशिद फलंदाजीला आला आणि त्याने 26 चेंडूत 53 धावांची खेळी केली. अफगाणिस्तान टी-20 लीगमध्ये त्याने सर्वात जलद अर्धशतक ठोकले. या खेळीत त्याने 3 चौकार आणि 6 षटकार मारले. राशिदने त्याच्या खेळी काही नवीन शॉट्स आणले. त्याने ‘नो-लूक’ षटकार, ’हेलिकॉप्टर शॉट’ असे दणदणीत फटके खेचले.