शिधापत्रिकाधारकांनी सोडला सुटकेचा निःश्वास
| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यात 24 दिवसांपासून सर्व्हर डाऊनमुळे स्वस्त धान्य दुकानात शिधापत्रिकाधारकांना धान्यापासून वंचित राहावे लागले होते. शुक्रवारी 24 व्या दिवशी सर्व्हर आल्याने शिधापत्रिकाधारकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
शहरासह तालुक्यात गेल्या 8 जुलैपासून स्वस्त धान्य दुकानदारांचे सर्व्हर डाऊनमुळे शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरण करता येत नसल्याने रेशनिंग दुकानदार त्रस्त झाले होते. गेल्या आठ दिवसांपूर्वी रेशनिंग तालुका संघटनेमार्फत मुरुड पुरवठा निरीक्षक यांच्याकडे शिधापत्रिकाधारकांना ऑफलाईन धान्य वितरण करण्याची मागणी केली होती. त्यावेळी शासनाने कोणतेही दखल घेतली गेली नाही. तद्नंतर सामाजिक कार्यकर्ते अरविंद गायकर यांनीही जिल्हाधिकारी व तहसीलदारांना शिधापत्रिकाधारकांना ऑफलाईन धान्य वितरण करावे, अशी विनंती केली होती. आज 24 व्या दिवस उजाडला आणि सर्व्हर आला रे आला तोपण नेटवर्क संथगतीने चालत होता. सायंकाळच्या दरम्यान चांगला नेटवर्क चालू झाल्याने स्वस्त धान्य दुकान नं. 3 गृहलक्ष्मी महिला बचतगट -सायली केने यांनी आपल्या भ्रमणध्वनीव्दारे शिधापत्रिकाधारकांना संपर्क साधून सर्व्हर आलेला आहे. आपला धान्य घेऊन जा, अशी गोड बातमी शिधापत्रिकाधारकांना देण्यात आली. ही बातमी मिळताच रेशनिंग दुकानात गर्दी होऊ लागली. रात्रभर 250 शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरणाचे काम सुरू ठेवण्यात आले होते. यावेळी रेशनिंग दुकानदार सायली केने यांचे शिधापत्रिकाधारकांनी आभार मानले व कौतुक ही केले.