रेशनिंगच्या धान्याला हमालांच्या संपाचा फटका

| पनवेल | प्रतिनिधी |

दोन आठवड्यांपासून हमालांनी संप पुकारल्याने त्याचा फटका रेशनिंग धान्य पुरवठा करताना होत आहे. पनवेल तालुक्यातील ग्रामीण भागात केवळ 18 ठिकाणी धान्य पोहोच झाले आहे. त्यामुळे नागरिक रेशनिंग धान्याची चातकाप्रमाणे वाट पाहात आहेत.

पनवेल शहरासह पनवेल तालुक्यात रेशनिंगची 199 दुकाने आहेत. यापैकी ग्रामीण भागात 134 दुकाने, तर शहरी भागात 65 दुकाने आहेत. हमालांनी विविध मागण्यांसाठी 8 ऑगस्टपासून संप पुकारला आहे. त्याचे निवेदन त्यांनी शासनाला दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, हमाल नसल्यामुळे रेशनिंगचे धान्य रेशनिंग दुकानात पोहोच झाले नाही. शहरी भागातील 65 दुकानांमध्ये धान्य पोहोच झाल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली. मात्र, ग्रामीण भागातील 134 पैकी केवळ 18 रेशनिंगच्या दुकानात धान्य पोहोच झाले आहे. उर्वरित 116 ठिकाणीच्या रेशनिंग दुकानात धान्य पोहोचले नाही, त्यामुळे धान्य कधी येणार आणि त्याचे वाटप कधी होणार याची वाट लाभार्थी पाहात आहेत.

ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या किंवा दुसर्‍या आठवड्यात सर्व दुकानांमध्ये धान्य पोहोच होणे गरजेचे होते. मात्र, संपामुळे 23 ऑगस्ट उजाडला तरीदेखील धान्य पोहोच झाले नाही आणि हमालांचा संपदेखील मिटला नाही. तालुक्यात जवळपास 80 हजार लाभार्थी शासकीय धान्याचा लाभ घेतात. मात्र, हमालांच्या संपाचा फटका या रेशनिंग धान्याला बसत आहे. शासनाने यावर लवकरात लवकर तोडगा काढावा आणि धान्य वितरण सुरू करावे, अशी मागणी लाभार्थी, रेशनिंग दुकानदार करत आहेत.

Exit mobile version