। अलिबाग । कृषीवल टीम ।
अंजनवेल समुद्रकिनारी चालणार्या डिझेल तस्करीविरोधात रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कारवाई करीत नऊ जणांना ताब्यात घेतले. या डिझेल तस्करीचे कनेक्शन रायगड जिल्ह्याशी असल्याची माहिती समोर येत आहे. राजकीय वरदहस्तामुळे रायगड जिल्ह्यातील मांडवा, रेवदंडा व इतर बंदरांवर डिझेल तस्करी करणार्यांचे फावले आहे. अनेकदा समुद्र मार्गाचा वापर करुन दहशतवादी हल्ले झाले असतानाही रायगड जिल्ह्याच्या सुरक्षेकडे कानाडोळा का केला जात आहे, असा सवाल उपस्थित होत आहे.
1992 मध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाला. त्यापूर्वी श्रीवर्धनमधील शेखाडी खाडीकिनारी आरडीएक्सचा साठा सापडला होता. मुंबईमध्ये 26 नोव्हेंबर 2008 मध्ये दहशतवादी हल्ला झाला. सागरी मार्गानेच येऊन हा हल्ला करण्यात आला होता. समुद्र मार्गानेच हल्ले होऊन अनेकांचा जीव गेला आहे. या घटनांना रोखण्यासाठी सरकारने त्यावेळी सागरी सुरक्षेवर भर दिला. मुंबईत जाण्यासाठी मांडवा बंदरातून जलवाहतुकीने प्रवास केला जातो. त्यामुळे सागरी सुरक्षेसाठी मांडवा सागरी किनारी व अन्य सागरी किनारी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यापासून पोलिसांचा कडेकोट पहारा ठेवण्यात आला. परंतु, नव्याचे नऊ दिवस या उक्तीप्रमाणे जिल्ह्याचा कारभार सुरु असल्याचे दिसून येत आहे.
रायगड जिल्ह्यातील मांडवा, रेवदंडा, श्रीवर्धनसह अन्य बंदरांपासून काही अंतरावर रात्रीच्यावेळी डिझेल तस्करी होत आहे. बाहेरून येणार्या बोटींतील व्यक्तींशी साटेलोटे करून त्यांच्याकडून डिझेल घेतले जाते. त्यानंतर बंदरावर आणून टँकरमार्फत त्याची वाहतूक केली जाते. अनेक वेळा काही पेट्रोल पंपावरही हा डिझेलचा साठा विकला जात असल्याची माहिती समोर येत आहे. ही बाब रायगडच्या पोलिसांना माहिती असतानाही त्यांच्याकडून बघ्याची भूमिका घेतली जात असल्याची खंत तक्रारदारांकडून उमटत आहे.
कडीया व राजू पंडीत यांच्यामार्फत ही डिझेल तस्करी रायगड जिल्ह्यात होत असल्याचे बोलले जात आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारीही केल्या आहेत. परंतु, त्यांच्याविरोधात ठोस कारवाई पोलिसांकडून झाली नसल्याचा आरोपही केला जात आहे. सागरी किनार्यांवर होणार्या या डिझेल तस्करीमुळे सागरी सुरक्षा धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सागर प्राईड, सागर फँचून, सागर एनर्जी या बोटीतून डिझेलची तस्करी केली जात आहे. बेकायदेशीर डिझेल तस्करीचा धंदा खुलेआमपणे राजकीय नेते मंडळींना हाताशी धरून चालू ठेवला जात आहे. जिल्ह्यात या तस्करीला ऊत आला असताना आता याचे कनेक्शन रत्नागिरीशी जुळल्याचे चित्र आहे. अंजनवेल येथील समुद्रकिनारी 18 नोव्हेंबर रोजी निवडणुकीच्या कालावधीत पहाटेच्या दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे गस्तीवर होते. त्यावेळी काही इसमांची संशयित हालचाल त्यांना दिसून आली. जेट्टीलगतच्या समुद्राच्या पाण्यामध्ये एक मच्छिमार बोट, एक रिकामे टँकर व चारचाकी वाहन त्यांना दिसले. पथकामार्फत तेथील इसमांची खात्री व मच्छिमार बोटीची तपासणी करण्यात आली. त्यावेळी डिझेलचा साठा त्यांना आढळून आला. रात्रीचा फायदा घेत सक्शन पंप व रबर पाईपच्या मदतीने रिकाम्या टँकरमध्ये डिझेल भरत होते. दरम्यान, दोन कोटी, पाच लाख, 95 हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. त्यामध्ये 25 हजार लीटर डिझेलचा समावेश आहे. नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यामध्ये उरणमधील निरंजन कोळी, जितेमधील विश्वनाथ ठाकूर, मिलिंद ठाकूर यांचा सहभाग असल्याचे उघड झाले. ही मंडळी राजू पंडितसाठी काम करीत असल्याची माहिती समोर येत आहे. रायगडसह आता डिझेलचे कनेक्शन रत्नागिरीसोबत असल्याचे उघड झाल्याने किनार्यांवरील सुरक्षा धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रेवदंड्यातून जाणार्या डिझेलवर पनवेल पोलिसांची कारवाई
जिल्ह्यातील समुद्रात कमी किमतीत डिझेल विकला जातो. एक मोठे बार्ज अथवा मासेमारी बोटीचा आधार घेत रात्रीच्यावेळी डिझेलची तस्करी खुलेआमपणे होत आहे. रेवदंडा पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या पुलाजवळ मागील काही महिन्यांपूर्वी डिझेल तस्करी रात्रीच्यावेळी करण्यात आली. पोलीस ठाण्यापासून पाचशे मीटर अंतरावर दोन टँकर उभे केले जात होते. डिझेल भरून झाल्यावर ते टँकर रस्त्याने रात्रीच्यावेळी जात होते. परंतु, पनवेल पोलिसांनी महामार्गावर छापा टाकून डिझेलची वाहतूक करणार्या टँकरवर कारवाई केल्याची माहितीही समोर येत आहे.
सात लाखांचे डिझेल जप्त
रायगड पोलिसांनी जानेवारीपासून गेली आठ महिन्यांपर्यंत डिझेल तस्करीवर कारवाई केली. या कारवाईत आठ हजार 250 रुपयांचा डिझेल जप्त करण्यात आला. त्याची किंमत सहा लाख 87 हजार इतकी आहे. त्यात दोन बोटी जप्त केल्या असून, त्यांची किंमत 25 लाख रुपये आहे. या कारवाईत डिझेलसह एकूण 31 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून देण्यात आली.