रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले

जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा कायम, प्रशासकीय यंत्रणा सज्ज
। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
राज्यात अनेक ठिकाणी पावसाने जोर धरला आहे. मुंबईसह कोकणात  तर मुसळधार पाऊस पडत आहे. अशावेळी अतिवृष्टीचं संकट अद्याप ठळलेलं नाही. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा कायम असून 20 जून पर्यंत मुसळधार ते अति-मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. कुलाबा वेधशाळेने हा अंदाज वर्तवला आहे. ज्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील खेड्यापाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे.

जिल्ह्यामध्ये बुधवारी (16 जून 2021) रोजी मुसळधार पावसाची नोंद झाली. जिल्ह्यातील राजापूर, लांजा, रत्नागिरी, संगमेश्‍वर, चिपळूण, गुहागर, दापोली, मंडणगड, खेड या सर्वच तालुक्यामध्ये मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. बुधवारी जोरदार कोसळलेल्या पावसाने जिल्ह्यातील जगबुडी, वाशिष्टी, काजळी, कोदवली, शास्त्री ,सोनवी, मुच्कुंडी, बावनदी इ. महत्त्वाच्या नद्या ओसंडून वाहत आहेत. या नद्या धोक्याच्या पातळीपर्यंत जाऊन पोहोचल्या होत्या. परंतु रात्री पावसाचा जोर थोडा कमी झाल्याने नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली नाही त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे.

चिपळूणमध्ये रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे पहाटे 3 वाजता वाशिष्ठी आणि शिव नदीचे पाणी चिपळूण बाजारपेठमध्ये शिरण्यास सुरुवात झाली होती. पावसाचा जोर ओसरल्यानंतर याठिकाणी पुराचा धोका टळला आहे. जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील काही व्हिडीओ देखील समोर आले आहेत, ज्यानुसार बाजारपेठा, रस्ते, घरांच्या आजुबाजूचा परिसर यामध्ये पाणी साचलं आहे. काही ठिकाणी पुराचं पाणी देखील शिरल्याने नागरिकांची तारांबळ उडत आहे.
गुरुवारी देखील रत्नागिरी जिल्ह्यातील विविध ठिकाणी सकाळपासून पाऊस सुरू आहे. परंतु पावसाचा जोर कमी असल्याने परिस्थिती नियंत्रणात आहे. परंतु हवामान विभागाने 20 जून पर्यंत अतिवृष्टीचा इशारा दिल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसंच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन सज्ज झाले आहे.

Exit mobile version