| माणगाव | प्रतिनिधी |
तालुक्यातील छत्रपती शिक्षण मंडळ, कल्याण संचलित माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी क्रीडा क्षेत्राला महत्त्व देत या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. गुरुवार दि. 11 डिसेंबर रोजी या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन अशोक धारिया, प्रशांत शेटे, वैशाली जाधव , सतीश पवार यांच्या उपस्थितीत झाले. उद्घाटनप्रसंगी संचलन, मानवंदना, क्रीडाध्वज फडकावणे, क्रीडाज्योत प्रज्वलन तसेच क्रीडा शपथविधी पार पडला. मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या क्रीडागुणांचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या क्रीडा महोत्सवात सांघिक कबड्डी, खो-खो, क्रिकेट तसेच वैयक्तिक धावणे, बुद्धिबळ, फेकी, रिले आदी विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. एकूण 135 विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. शनिवारी (दि.13) आयोजित पारितोषिक वितरण समारंभात ॲड. सुनील मोंडे, संतोष कदम व पालकवर्ग यांच्याहस्ते यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. सर्व विजयी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्रे व शैक्षणिक साहित्य प्रदान करण्यात आले. हा क्रीडा महोत्सव यशस्वी करण्यासाठी श्रीकृष्ण गर्धे, अजित शेडगे, तसेच विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उत्तम नियोजन केले. अशोक धारिया, प्रशांत शेटे, डॉ. शिरीषकुमार पेंडसे, ॲड. सुनील मोंडे यांनी या स्पर्धेसाठी आर्थिक सहकार्य केले वार्षिक क्रीडा महोत्सवाच्या यशस्वी आयोजनाबद्दल छत्रपती शिक्षण मंडळ कल्याणचे अध्यक्ष डॉक्टर नंदकिशोर जोशी, डॉ. निलेश रेवगडे व संस्था पदाधिकारी यांनी कौतुक केले आहे.







