। मुंबई । प्रतिनिधी ।
महायुती सरकारने मुख्यमंत्रीपद, मंत्रीमंडळ विस्तार, खातेवाटपाला महिनाभराचा कालावधी घेतल्यानंतर आता जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदावरून आता नेत्यांमध्ये रस्सीखेंच सुरू आहे. या सर्वादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा त्यांच्या दरे या मूळ गावी विश्रांतीसाठी गेले आहेत. त्यावरून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी त्यांना टोला लगावला आहे.
संजय राऊत म्हणाले की, उपमुख्यमंत्र्यांची तब्येत पुन्हा बिघडली असून ते त्यांच्या गावी गेले आहेत. त्यांची तब्येत सतत बिघडत असते त्यामुळे मला त्यांची काळजी वाटते. फडणवीस साहेबांनी त्यांच्यावर काय जादू केली माहित नाही. पण एवढे धष्टपुष्ठ व्यक्ती सतत कसे आजारी पडतात, असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे. तसेच, पालकमंत्रीपदावरून देखील त्यांनी सत्ताधार्यांना फटकारले आहे. आघाडी किंवा युतीच्या सरकारमध्ये शेवटपर्यंत अशा गोष्टी होत असतात. त्याला कुणी अपवाद नाही. मुंबईचे पालकमंत्रीपद कुणालाही मिळाले तरी मराठी माणसाला घरं स्वस्त मिळणार आहे का, असा सवालही संजय राऊत यांनी केला आहे.
पुढे बोलताना म्हणाले की, बीडचे पालकमंत्रीपद कोणत्याही मुंढे यांना मिळाले तरी संतोष देशमुखला न्याय मिळणार आहे का? परभणीचे पालकमंत्रीपद कुणालाही मिळाले तरी सोमनाथ सुर्यवंशीला न्यायमिळणार का? प्रत्यक्षात पालकमंत्रीपदाचा काही उपयोग नसतो. त्यानिमित्ताने त्या त्या जिल्ह्याची सत्ता आणि आर्थिक व्यवहाराची सूत्र आपल्याकडे राहावी. म्हणून पालकमंत्रीपद पाहिजे असते. गडचिरोलीचे पालकमंत्रीपद काही लोकांना कायमच हवे होते. ते काही नक्षलवादाचा खात्मा करण्यासाठी नको, तर गडचिरोलीत मायनिंग कंपन्या आहेत तिथून मलिदा मिळावा म्हणून घेतले होते, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.