। नाशिक । प्रतिनिधी ।
कुणाल कामराच्या गीताने संपूर्ण महाराष्ट्रभर तुफान आले. मात्र, या गीतामुळे अस्वस्थ झालेल्या शिंदे गटाने महापालिकेची यंत्रणा कामाला लावली आणि कुणालच्या खार येथील स्टुडिओवर पाडकामाची कारवाई करण्यास भाग पाडले. यावरून शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. ते नाशिक येथे माध्यमांशी बोलत होते.
यावेळी संजय राऊत म्हणाले की, कुणाल कामरा या क्षेत्रात नवीन आलेला तेव्हा त्याने काँग्रेस पक्षावर, मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी यांच्यावरही अशा प्रकारचे शो केले होते. परंतु, कुणाल कामराचा शो झालेल्या हॅबिटेट हॉटेलचा स्टुडिओ, व्यासपीठ अनधिकृत दाखवून तोडण्यात आले. तुमच्यावर टीका केल्यानंतर या वास्तूमध्ये बेकायदेशीर काम केल्याचा साक्षात्कार तुम्हाला झाला का, असा सवाल राऊत यांनी केला.
ते पुढे म्हणाले की, तरुण कलाकारांचे एक व्यासपीठी सरकारने तोडले. कुणाल कामरावर कायदेशीर कारवाई करू शकत होतात. परंतु, यालाच औरंगजेबाची वृत्ती म्हणतात. औरंगजेबाने मंदिरं तोडली, तुम्ही लोकशाहीचे मंदिर तोडले. जर तुम्हाला अनधिकृत बांधकामे तोडायची असतील तर मलबार हिलला बुलडोझर फिरवा. तसेच, सर्व मंत्र्यांच्या बंगल्यांमध्ये महापालिकेची परवानगी न घेता 100 टक्के बेकायदेशीर कामं झालेली आहेत. महापालिकेने अगदी वर्षा बंगल्यापासून निरीक्षण करावे. सगळे सरकारी अधिकारी, मंत्री असतील त्या प्रत्येकाच्या घरात, मागे-पुढे, आतमध्ये या स्टुडिओपेक्षा मोठी अनधिकृतपणे कामं झालेली आहेत. आम्ही कायद्याचे पालन करणार लोक आहोत म्हणता ना, मग कायदा सगळ्यांसाठी सारखा ठेवा, असेही राऊत म्हणाले.