। मुंबई । प्रतिनिधी ।
अमित शहा यांनी देशाचे पोलीस स्टेट केले आहे, पोलिसांच्या दबावाखाली असलेले हे राष्ट्र आहे. परंतु, महाराष्ट्र त्याला अपवाद आहे, कारण महाराष्ट्रात गुंडाराज आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशा शब्दात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सत्ताधार्यांना फटकारले आहे.
स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या स्टुडिओमध्ये घडलेल्या प्रकारावर बोलताना संजय राऊत यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून सत्ताधार्यांना चांगलेच फटकारले आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, अमित शाह यांनी देशाचे पोलीस स्टेट केला आहे. म्हणजेच पोलिसांच्या दबावाखाली असलेले राज्य तयार केले आहे. परंतु, महाराष्ट्र याला अपवाद आहे. महाराष्ट्रात गुंडा राज्य आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच, कुणाल कामरा याने राजकीय व्यंग, टीका-टिपण्या आमच्यादेखील केल्या आहेत. 50 ते 60 लोक जातात आणि स्टुडिओ फोडतात, या महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभल्याचे हे लक्षण आहे. फडणवीस यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री पद सोडावं, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.
राऊत पुढे म्हणाले की, एक ब्रॉडकास्टर स्टुडिओ उद्ध्वस्त केला. पोलीस झोपा काढत होते का? महाराष्ट्रात आणीबाणी लावलेली आहे का? ज्याप्रमाणे नागपूरमध्ये दंगलखोरांकडून नुकसान भरपाई भरून घेणार असल्याचे फडणवीस म्हणतात, त्याचप्रमाणे या दंगलखोर्यांना तुम्ही सोडणार आहात की नाही आणि त्यांचे नुकसान देणार की नाही? हा एक प्रश्न आहे. तसेच, महाराष्ट्राच्या राजधानीत तुम्ही गुंडाराज चालवत आहात. या गाण्यांमध्ये कोणाचाही उल्लेख नाही. कालच्या घटनेबद्दल मुंबईच्या पोलीस आयुक्तांची ट्रान्सफर झाली पाहिजे. हा संपूर्ण कट दीड-दोन तास आधीच शिजला होता. मुंबई पोलीस काय करत होते? असा सवालदेखील त्यांनी यावेळी बोलताना केला आहे.