राजा केणींसह आमदार दळवींना दिलीप भोईर यांचा इशारा
। अलिबाग । प्रतिनिधी ।
भाजपचे दिलीप भोईर यांनी माकड चाळे थांबवावे, असे वादग्रस्त वक्तव्य शिंदे गटातील जिल्हाप्रमुख राजा केणी यांनी केले होते. श्रीराम सेतू वानरांनीच बांधला आणि रावणाची लंकादेखील वानरांनीच जाळली, असा टोला दिलीप भोईर यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात राजा केणी यांच्यासह आमदार महेंद्र दळवी यांना लगावला. आगामी विधानसभेच्या निवडणुकीत आमदार दळवी हे अपयशी ठरणार आहेत, असा इशारादेखील त्यांनी दिला आहे. त्यामुळे आगामी काळात शिंदे गट आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
अलिबाग विधानसभा मतदारसंघात आदिवासी ठाकूर समाज मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांनी दळवींना निवडून दिले. परंतु, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यास आमदार अपयशी ठरले आहेत. पाच वर्षांत हा समाज विकासापासून वंचित राहिला आहे. फक्त बॅनरबाजी करून जनतेची फसवणूक केली जात आहे. विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी आणल्याचा दावा दळवी यांनी केला. परंतु, आजही अलिबाग, मुरूड मतदारसंघातील अनेक गावांना विकासाची प्रतीक्षा लागून राहिली आहे, असे टीकास्त्र भोईर यांनी डागले. स्वतःच्या फायद्यासाठी हे आदिवासी समाजाचा वापर करून घेत आहेत. फक्त निवडणुकीपुरतेच त्यांना विचारले जाते. इतर वेळेला त्यांना वार्यावर सोडले जात आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
कामाचे ठेके घेणार्या कार्यकर्त्यांना धमकावून निवडणुकीत काम करा, अन्यथा पुढच्या वेळेला काम देणार नाही, असे बोलले जात आहे. आगामी निवडणुकीत अपयश येण्याची भीती दळवींना वाटत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू सरकू लागली आहे. अलिबाग तालुक्यासह अन्य तालुक्यांतील गावे, वाड्यांना पाणीपुरवठा होऊ शकतो, इतके मोठे उमटे धरण आहे. धरणातील गाळाचा प्रश्न गंभीर आहे. तो सोडविण्याऐवजी विद्यमान आमदारांनी धरणात पाईपलाईन टाकण्यासाठी निधी मंजूर केला आहे. परंतु, गाळ काढण्यासाठी निधी मंजूर करण्याकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष झाल्याचा घणाघात त्यांनी केला. धरणात पाणी मुबलक असेल, तर पाईपद्वारे पाणीपुरवठा केला जाईल, असा टोला आमदार दळवी यांना लगावत ते पुढे म्हणाले, अलिबाग, मुरूड मतदारसंघातील विकासकामांसाठी पाच हजार कोटी रुपयांचा निधी आणला आहे, असा दावा आमदार करीत आहेत. परंतु, आजही अलिबाग, मुरुडसह रोहा तालुक्यातील गावे, वाड्या पाणी, रस्ता व अन्य सोयी सुविधांपासून वंचित आहेत. फक्त टक्केवारी काढून स्वतःचा फायदा साधण्याचे काम लोकप्रतिनिधींकडून केले जात आहे. निधी मंजूर केल्याचे बॅनर लावले जात आहेत. प्रत्यक्षात मात्र काम काहीच दिसून ये त नाही, अशी खरमरीत टीका दिलीप भोईर यांनी केली.
श्रीराम सेतू वानरांनीच बांधला. रावणाची लंका वानरांनीच जाळली. त्यामुळे माकड चाळे थांबवा, असे बोलणार्या राजा केणी यांनी हे लक्षात ठेवावे, असा टोला दिलीप भोईर यांनी लगावला. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपकडूनच शिंदे गटाला दणका मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.