पाक-वेस्ट इंडिजचा सामना पाहण्यासाठी रवी शास्त्री मैदानाबाहेर उभे !

। दुबई । वृत्तसंस्था ।
विश्‍वकरंडक स्पर्धेत रविवारी भारत पाकिस्तान महामुकाबला होणार आहे. भारतीयांसाठी पाकिस्तानचा सध्याचा संघ परिचित नसल्यामुळे त्यांचा सराव सामना आवर्जून पाहण्यासाठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि साहाय्य अधिकारी मैदानाबाहेर उपस्थित होते. दुबई क्रिकेट अकादमीत क्रिकेटची दोन मोठी मैदाने एकमेकांना लागून आहेत. एका मैदानावर भारताचा इंग्लंडविरुद्ध सराव सामना होता; तर दुसर्‍या मैदानावर पाकिस्तानचा वेस्ट इंडिजविरुद्ध सामना होता. या वेळी शास्त्री आणि त्यांच्या कोचिंग स्टाफने सामन्याची रेकी केली.
भारतीय खेळाडू आपल्या सामन्यासाठी मैदानात आले, तेव्हा पाकिस्तानचा सामना सुरू होता. वेस्ट इंडिजची प्रथम फलंदाजी होती. त्यांचे 131 धावांचे आव्हान पाकिस्तानचा संघ पार करत असताना भारतीय खेळाडू तेथे आले आणि आपल्या सामन्याची तयारी करण्यापूर्वी शास्त्री आणि काही खेळाडूंनी पाकिस्तानची फलंदाजी पाहण्यावर भर दिला. पाकिस्तानच्या संघाबाबत आम्हाला फारशी माहिती नाही. त्यांच्याविरुद्ध रविवारी सामना खेळायचा असल्यामुळे आता त्यांचा खेळ पाहणे आम्ही पसंत केले, असे भारताच्या एका खेळाडूने सांगितले.
या सामन्याचे सोशल मीडियावर प्रक्षेपण होत होते. त्या वेळी मैदानाबाहेर उपस्थित असलेले भारतीय प्रशिक्षक आणि खेळाडूंचे लगेचच चित्रीकरण झाले आणि ही छायाचित्र सोशल मीडियावर प्रसिद्धही झाली.
रेकी करत असलेल्यांमध्ये रवी शास्त्री, भुवनेश्‍वर कुमार, दीपक चहर, शार्दूल ठाकूर प्रामुख्याने दिसून येत होते. भारतीय टीम रेकीफसाठी येथे आली तेव्हा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम फलंदाजी करत होता. आझमने या सामन्यात अर्धशतकही केले. पाकिस्तानचा सामना संपल्यानंतर त्यांची काही भारतीय खेळाडूंबरोबर नजरानजर झाली; परंतु कोणताही संवाद झाला नाही. भारतीय खेळाडू लगेचच आपल्या सामन्यासाठी बाजूच्या मैदानावर गेले.
भारतीय खेळाडू आपल्या सामन्यासाठी लगेचच दुसर्‍या मैदानात रवाना झाले असले, तरी रवी शास्त्री यांनी पाकिस्तान संघाचे मार्गदर्शक फिल सिमंस आणि मॅथ्यू हेडन यांची भेट झाली. या तिघांचे एकत्रित छायाचित्र पाकिस्तान क्रिकेट मंडळानेच सोशल मीडियावरून प्रसिद्ध केले. हेडन हे पाकिस्तान मार्गदर्शक टीममध्ये नव्याने दाखल झाले आहेत.

Exit mobile version