आरसीएफ स्फोट प्रकरण; ठेकेदार सुपरवायझरसह दोन अधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील थळ येथील खत निर्मित आरसीएफ कंपनीत एसजीपी प्लांटमधील एम.सी.सी. रूम या विभागात एसी रुमच्या कॉम्प्रेसरचे काम सुरू असताना अचानक स्फोट होऊन चार कर्मचारी मयत होऊन तीन जण स्फोटात भाजल्याने गंभीर जखमी झाले असल्याची घटना बुधवारी 19 ऑक्टो. रोजी घडली होती. या अपघाताबाबत आरसीएफ कंपनीचे दोन विद्युत विभागाचे अधिकारी, ठेकेदार आणि त्याचा सुपरवायझर अशा चार जणांवर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. अधिकारी आणि ठेकेदार यांची जबाबदारी असतानाही त्यांनी दुर्लक्ष आणि निष्काळजीपणा केल्याने कर्मचार्‍याच्या मृत्यूस आणि जखमी झाल्याचा ठपका आरोपीवर ठेवण्यात आला आहे.

अंधेरी येथील आरोपी क्रमांक एकच्या अरीजो ग्लोबल एससी सिस्टीम सप्लायर या कंपनीला आरसीएफ थळ येथील कंपनीत एसजीपी प्लांट मधील एमसीसी रूम येथे वातानुकूलित यंत्रणा बसविण्याचे काम मिळाले होते. आरोपी यांनी कामाची देखरेख ठेवण्यासाठी आरोपी क्रमांक दोन यास ठेवले होते. आरोपी यांनी या कामासाठी पाच अकुशल कामगार कामावर ठेवले होते. ठेकेदार आणि देखरेख ठेवणार्‍या आरोपी यांनी कामगाराच्या सुरक्षेबाबत कोणतेही सुरक्षा साधनेही त्यांना देण्यात आली नव्हती. त्याचबरोबर आरसीएफ कंपनीतील विद्युत विभागाचे प्रमुख आणि त्याचे सहकारी या दोन आरोपींनीही काम सुरू असताना विद्युत पुरवठा होऊ न देणे, काम सुरू असताना कामाची पाहणी करून त्रुटी काढणे याबाबत आपली जबाबदारी असतानाही कामात निष्काळजीपणा केला.

विद्युत विभागाचे दोन अधिकारी, ठेकेदार आणि सुपर वायझर यांच्या निष्काळजीमुळे एसजीपी प्लांट मधील एमसीसी रूम या विभागात कंपनी मॅनेजमेंट ट्रेनी आणि पाच कर्मचारी एसी रुमच्या कॉम्प्रेसरमध्ये गॅस भरत असताना विद्युत पुरवठा होऊन स्फोट झाला. अंकित शर्मा, फैजून जुनेद शेख, दिलशाद आस्लाम इदनिकी आणि साहिद मोहम्मद सिद्दीकी हे चारजण मयत झाले. जितेंद्र शेळके, अतींदर मनोज हे दोघे जखमी झाले होते. या स्फोट प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

स्फोट प्रकरणात तपासणी करण्यासाठी आरसीएफ कंपनीतर्फेही उच्च स्तरीय समिती गठण केली होती. ठेकेदार, सुपर वायझर, कंपनीचे दोन अधिकारी अशा चार जणांवर निष्काळजी पणाचा ठपका ठेवून अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याबाबत पुढील तपास अलिबाग पोलीस निरीक्षक शैलेश सणस हे करीत आहेत.

Exit mobile version