इवलेसे रोप लावियले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी
| अलिबाग | प्रतिनिधी |
थळमधील आरसीएफ रवींद्र वर्तक, श्रीनिवास पाटील, शरद देशमुख आणि विष्णू बापट या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी कै.अनंतराव कुलकर्णी (आरसीएफचे जनसंपर्क अधिकारी) यांचे प्रेरणेने स्थापन केलेल्या आरसीएफ एक्स एम्प्लॉईज सोशल फोरमने आता दहा वर्षे पूर्ण होऊन अकराव्या वर्षांमध्ये पदार्पण केले आहे. चार जणांनी लावलेल्या या लहानशा रोपाचा वेलू आता गगनावरती गेला आहे, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. फक्त चार-पाच जणांनी सुरुवात केलेल्या या फोरमचे आता एक हजारच्या वर सभासद झाले आहेत. इवलेसे रोप लावियले दारी त्याचा वेलू गेला गगनावरी अशा प्रकारचे काम या फोरमचे आहे. निवृत्त झालो, पण थकलो नाही, हे ब्रिद वाक्य घेऊन फोरम काम करीत आहे.
एक जुलै 2015 रोजी डॉक्टर डे साजरा करण्याच्या निमित्ताने एकत्र आलेल्या या मंडळींनी त्याच दिवशी आरसीएफ एक्स एम्प्लॉइज सोशल फोरम, थळ ची स्थापना केली. सर्व सेवानिवृत्त एम्प्लॉईजनी एकत्र यावे, एकमेकांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना लागणाऱ्या सर्व प्रकारच्या गरजा व येणाऱ्या अडचणी जास्तीत जास्त सोडवण्यास मदत म्हणून काम करावे. समाजकार्य करावे हा या मागचा उद्देश आहे.
या मंडळींची पहिली सभा संकष्टी चतुर्थीला कुरुळ येथील आरसीएफ वसाहतीमधील गणपतीच्या मंदिरात झाली. त्यानंतर गेली अकरा वर्षे करोना काळ सोडला तर सातत्याने प्रत्येक संकष्टी चतुर्थीला ही सभा होत आहे. कोणालाही यासाठी खास आमंत्रण नसते. सर्वजण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी दहा वाजता, गणेश मंदिरात आवर्जून एकत्र येतात. यातून जून्या मित्रांचीदेखील भेट होते. एकमेकांसोबत गप्पा गोष्टी ही होतात. या सभेची सुरुवात राष्ट्रगीताने केली जाते.
त्यानंतर भारत माता की जय असा जयघोष केला जातो. यामुळे सभासदांच्या मनात राष्ट्र अभिमान निर्माण होतो. आणि त्यानंतर मित्रांचे वाढदिवस, दिवंगताना श्रध्दांजली, आदी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करून डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेतले जाते. हाडांची घनता मोजणे, डोळ्यांची आतील पटलाची तपासणी करणे, प्रोस्टेट ग्लँडची तपासणी, मानसिक आरोग्य कसे राखावे, सायबर फ्रॉड पासून कसा बचाव करावा असे अनेक उपक्रम घेतले जातात. ग्रीन एनर्जीचा उपयोग व्हावा म्हणून फोरमतर्फे 105 सभासदांनी सोलर सिस्टम लावून घेतली आहे. आर्थिक गुंतवणूक आदी विषयावर मार्गदर्शन घेतले आहे. या सर्व कार्यासाठी डॉ. जी टी पाटील यांचे अत्यंत मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन मिळते. सर्व कार्यक्रमाचे नियोजन तसेच अंमलबजावणीसाठी 24 जणांची कोअर कमिटी फोरमच्या माध्यमातून एकत्रितपणे व उत्साहाने काम करीत असते.
सामाजिक बांधिलकी जपली जाते
सामाजिक भान ठेऊन वृद्धाश्रमात जाऊन येथील वृद्धांची मेडिकल तपासणी करून त्यांना औषध पुरवणे, मतिमंद मुलांकडून फुले किंवा कागदी पिशव्या विकत घेणे. त्यांना कागदी पिशव्या बनवण्यासाठी वर्तमानपत्राची रद्दी भेट म्हणून देणे, आर्थिक मदत करणे, इत्यादी समाजोपयोगी कार्य सुद्धा फोरमच्या माध्यमातून केले जात आहेत. नेत्रदानासाठी व देहदान करण्यासाठी सभासदांना जागृत करण्याचे काम फोरमद्वारे केले जाते.






