| अलिबाग | प्रतिनिधी |
गेल्या अनेक वर्षापासून सुरु असलेली आरसीएफ कंपनीची शाळा बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. या बंद शाळेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भिती पालकांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आरसीएफ कंपनीने पुढाकार घेऊन हा प्रश्न मार्गी लावल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळणार आहे.
आरसीएफ कंपनी थळ या ठिकाणी उभारण्यात आली. त्यानंतर कुरुळ परिसरात आरसीएफ कर्मचारी वसाहत बांधण्यात आली. कंपनीतील कर्मचारी, स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या मुलांसह ग्रामीण भागातील मुलांसाठी डेक्कन एज्युकेशन सोसायटी संचलित आरसीएफ स्कूल या परिसरात उभारण्यात आली. गेल्या 42 वर्षापासून आरसीएफ कर्मचारी वसाहतीच्या आवारात ही शाळा आहे. या शाळेतून अनेक विद्यार्थी घडले आहेत. राज्य, देश पातळीवर या शाळेतील विद्यार्थ्यांनी नावलौकीक प्राप्त केले आहे.
अलिबाग तालुक्यातील सुडकोलीपासून रेवस परिसरातील अनेक विद्यार्थी आरसीएफ स्कूलमध्ये शिकण्यास येतात. मात्र, गेल्या काही महिन्यापासून ही शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने याबाबत आरसीएफ कंपनीला पत्र दिल्याचे सांगण्यात आले आहे. या निर्णयामुळे आरसीएफ स्कूलमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती पालकांमध्ये निर्माण झाली आहे. आरसीएफ शाळा बंद होऊ नये या भुमिकेत पालक आहेत. अलिबागमध्ये पालक व कंपनीच्या अधिकाऱ्यांसमवेत गुरुवारी बैठक झाली. शाळा सुरु ठेवा अशी मागणी पालकांनी केली. परंतु, कंपनीच्या हातात काहीच नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे आरसीएफची शाळा सुरु करण्याबाबत कंपनी प्रशासन काय भुमिका घेणार, याकडे पालकांचे लक्ष लागून राहिले आहे.
आरसीएफ शाळेतून विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळते. त्यामुळे अनेक भागातील पालकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना आरसीएफच्या शाळेत दाखल करून घेतले आहे. मात्र, अचानक शाळा बंद होण्याच्या निर्णयामुळे चिंता निर्माण झाली आहे. पालक वर्गात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कंपनीने याकडे गांभिर्याने लक्ष देऊन शाळा सुरु ठेवावी.
वाघपंजे, पालक
डेक्कन एज्युकेशन सोसायटीने आरसीएफ समवेत शाळा सुरु ठेवण्याबाबत असमर्थता दाखविली आहे. आरसीएफ स्वतः शाळा चालवू शकत नाही. मात्र, विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी कंपनी प्रशासन प्रयत्न करीत आहे. आणखी दोन वर्ष सोसायटीने शाळा सुरु ठेवावी. त्या कालावधीत पुढील कार्यवाही करण्याबाबत कंपनी निर्णय घेईल.
संजीव हरळीकर महाव्यवस्थापक
आरसीएफ कंपनी थळ