रायगड जिल्हा बँकेच्या 62 व्या शाखेचे उद्घाटन; एक टक्का जादा व्याज
माथेरान / नेरळ | वार्ताहर |
आगामी काळात माथेरानच्या विकासामध्ये रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा महत्वाचा आणि सिंहाचा वाट असेल अशी ग्वाही बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली. माथेरानमधील बँकेच्या खातेदारांना एक टक्का अधिक व्याज दिले जाईल व कर्जदार खातेदारांना कमी व्याज आकारले जाईल अशी महत्वपूर्ण घोषणाही त्यांनी यावेळी केली.
कर्जत तालुक्यातील माथेरान येथील रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यामाथेरान विस्तारित कक्षाचे कोनशिला अनावरण आणि बँकेच्या शाखेच्या विस्तारित कक्षाचे उद्घाटन मंगळवारी 10 ऑक्टोबर रोजी आमदार पाटील यांचे हस्ते करण्यात आले .त्यावेळी ते बोलत होते.माथेरान हे गाव तीन हजार मतांचे आणि पुढारी 400 आहेत.माथेरान नागरी पतसंस्था सावंत, चौधरी यांनी ती व्यवस्थित चालवून दाखवली आहे. या ठिकाणी मी तुमचा देणेकरी म्हणून आलो आहे असे सांगून पाटील म्हणाले कि, माझे आजोळ माथेरानच्या पायथ्याशी असल्याने या भागाचे आणि येथील जनतेचे मी काही देणे लागतो.पूर्वी करारनामा न करता दिले. आता देता येणार नाही. कारण आज ते लगेच तुरुंगामध्ये टाकतील. आता कानाला खडा लावला आहे. खालापूर शिक्षण मंडळावर कोट्यवधी रुपयांचे कर्ज होते. मोठ्या लोकांनी उभी केलेली संस्था आहे. त्यामुळे ही संस्था टिकावी यासाठी लक्ष दिले. माथेरानमध्ये शाखा उघडावी यासाठी सात वेळा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये मध्ये गेलो. त्यामुळे माथेरानमध्ये शाखा उघडायला एवढा वेळ लागला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
माथेरानमध्ये शनिवार, रविवार व्यवसाय असतो. त्यामुळे रविवारी देखील बँकेचा व्यवसाय सुरू ठेवता येईल का हे पाहिले पाहिजे.असे सांगून जयंत पाटील यांनी एटीएम सेवा सुरूच राहील पण सर्व पॉइंटवर बँकेची मदत पोहचली पाहिजे. यासाठी प्रयत्न करावेत आणि त्यासाठी बँकेचे पथक माथेरानमध्ये येवून सर्वेक्षण करील असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले. यावेळी बँकेचे उप अध्यक्ष सुरेश खैरे, रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी मते, संतोष पाटील, अण्णा दिवेकर, शेकाप तालुका चिटणीस श्रीराम राणे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती नारायण डामसे, जिल्हा बँकेचे माजी संचालक आणि कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रकाश फराट, खालापूर येथील अध्यक्ष संतोष जंगम, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, नेरळ शहर चिटणीस शफीक शेख, माथेरानचे माजी नगराध्यक्ष विवेक चौधरी, मनोज खेडकर, अजय सावंत, बबिता शेळके, माथेरान उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, प्रसाद सावंत, माथेरान व्यापारी फेडरेशन अध्यक्ष राजेश चौधरी, भाजप शहर अध्यक्ष प्रवीण सकपाळ, माथेरानचे सहायक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे, रमाकांत तोरणे, सहचिटणीस उमेश कदम, राजेंद्र हजारे, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी अध्यक्ष गजानन पेमारे, विद्यमान उपाध्यक्ष कृष्णा बदे, तसेच शेकाप तालुका उपाध्यक्ष रवींद्र भोईर, नेरळ सोसायटी अध्यक्ष राजेंद्र विरले, उपाध्यक्ष रवींद्र झांजे, शेकाप तालुका युवा मोर्चा अध्यक्ष महेश म्हसे, अलिबाग अर्बन बँकेचे संचालक जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी 62वी शाखा सुरू होण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान करणारे शेकाप तालुका चिटणीस श्रीराम राणे,जागा मालक प्रतिक ठक्कर,अश्वपाल संघटना अध्यक्ष आशा कदम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.या वेळी माथेरान नागरी पतसंस्थेने जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचा सत्कार करताना पतसंस्थेची 10 लाखाची ठेव बँकेत ठेवण्याचा निर्णय घेतला आणि त्याचा धनादेश देखील वर्तक यांना सुपूर्द केला.कार्यक्रमाचे सूत्र संचालन संदीप जगे यांनी केले. बँकेला 62 वर्षे पूर्ण झाले असून आज बँकेच्या माथेरानमधील 62 व्या शाखेचे उद्घाटन हा दुग्धशर्करा योग आहे. माथेरानमध्ये शाखा उघडणे हे मोठे आव्हान असून येथील भौगोलिक स्थिती आणि आर्थिक व्यवहार याबाबत आम्ही साशंक होतो. मात्र बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी कमी लोकांना बँकेच्या शाखा उघडण्याची सूचना केली आणि माथेरानमध्ये बँकेच्या शाखेचे उदघाटन होत आहे. असे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी सांगितले.
माथेरान नागरी पतसंस्था सभापती अजय सावंत म्हणाले कि, आम्ही अनेक वर्षे जिल्हा बँकेची शाखा माथेरानमध्ये असावी यासाठी प्रयत्न करीत होतो.माथेरान पतसंस्था आणि शफीक शेख यांच्या प्रयत्नाने माथेरानमध्ये दुसरी बँक सुरू झाली असून त्यामुळे माथेरानमध्ये अर्थसहाय्य मिळण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माथेरान पतसंस्था ताब्यात घेतली. त्यावेळी आमच्याकडे 84 रुपयांची शिल्लक होती. आमदार जयंत पाटील यांनी आम्हाला कोणतेही कागदपत्र न पहाता कर्ज दिले आणि त्यामुळे गणपतीमध्ये लोकांना पैसे देऊ शकलो अशी आठवणही त्यांनी सांगितली.
माथेरानमधील जे नागरिक या शाखेत ठेवी ठेवतील त्यांना एक टक्का व्याज देऊ . कर्ज घेतील त्यांना अर्धा टक्के सवलत देऊ असे जयंत पाटील यांनी जाहीर केले. शेतकऱ्यांना आम्ही चार टक्के व्याज देत होतो. आता आम्ही शून्य टक्क्याने कर्ज देत असतो. माथेरानच्या उत्पन्नात आणि दरडोई उत्पन्नात बदल झाला पाहिजे असे जाहीर करून या माथेरान पतसंस्था देखील अद्ययावत करण्याची सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिली.
आमदार म्हणून अडीचशे प्रश्न मागील विधीमंडळ अधिवेशनात मांडले आणि 75 प्रश्न तडीस नेले आहेत. तुम्ही एमएमआरडीएमध्ये आहात. या ठिकाणी निधी आला असेल तर दिसत नाही. या ठिकाणी रेल्वे आहे, पण सुविधा नाहीत असे सांगून मी खासदार असतो तर माथेरानचे रूपच बदलले असते. पण मी खासदार होणार नाही, मी खासदारकीची निवडणूक लढणार नाही. कारण मी इतरांना खासदार बनवले आहे. असेही पाटील म्हणाले.
माथेरानचा विकास साधण्यासाठी माथेरान हाच पक्ष करा. माथेरानमध्ये बँकेचा व्यवसाय तीनपट होऊ शकतो. माथेरानचा विकास करायचा असेल तर व्हा आणि पक्षाचे नाव न घेता बंगलेवाले, पर्यावरण प्रेमी यांना एकत्र करा. झोपडपट्टीधारकांनाही न्याय देण्यासाठी काम करा. पक्ष बाजूला ठेवून व्यवसायिक दृष्टिकोनातून विकास साधायचा असतो. झोपडपट्टी पुनर्वसन योजना अमलात आणण्यासाठी सर्व पक्षीय नेत्यांनी एकत्र यायला हवे. ही योजना राबविण्यासाठी आपण प्रथम प्राधान्य देऊ, असेही आमदार जयंत पाटील यांनी जाहीर केले.