65 व्या वार्षिक सभेत 12.5 टक्के लाभांश जाहीर
आधुनिक शेतीसाठी कृषीमित्र योजनेची घोषणा
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक प्रगतीचा आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत 8,175 कोटी रुपयांच्या व्यवसायाची नोंद केली असून, आता 10 हजार कोटी रुपयांचा व्यवसाय आणि 1,000 कोटी रुपयांचा स्वनिधी गाठण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य निश्चित केले आहे. बँकेच्या 65 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही घोषणा करत अध्यक्ष जयंत पाटील यांनी सभासदांसाठी 12.5 टक्के लाभांश जाहीर केला.
अलिबाग येथील बँकेच्या केंद्र कार्यालयात झालेल्या सभेला संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक, अधिकारी, कर्मचारी, सभासद तसेच जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात जयंत पाटील यांनी बँकेने केवळ आर्थिक प्रगतीच साधली नसून शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठीही विविध उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले. आधुनिक आणि उत्पन्नक्षम शेतीला चालना देण्यासाठी कृषीमित्र योजना सुरू करण्यात आली असून, पडीक जमिनीवर बांबू लागवड तसेच ड्रॅगन फ्रूट प्रकल्पांसाठी केवळ 7 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाणार असल्याची घोषणा त्यांनी केली. रोहा येथील प्रगतशील शेतकरी हर्षद साळवी यांनी ड्रॅगन फ्रूट शेतीत केलेल्या यशस्वी प्रयोगाचेही त्यांनी विशेष कौतुक केले.
यावेळी त्यांनी आणखी एक महत्त्वाची बाब अधोरेखित करत सांगितले की, जिल्ह्यातील सर्व विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे संगणकीकरण पूर्ण करणारी रायगड बँक ही देशातील पहिली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ठरली आहे. तसेच महाराष्ट्रात प्रथमच ऑनलाइन व बायोमेट्रिक पद्धतीने पीककर्ज वितरण प्रणाली सुरू करण्यात आली असून, 7/12 ची ऑनलाइन पडताळणी करून पारदर्शक, जलद आणि विश्वासार्ह कर्जप्रक्रिया राबविण्यात येत आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी आर्थिक वर्ष 2025-26 चा सविस्तर अहवाल सादर करत बँकेने नेट एनपीए शून्य टक्के राखत 93.37 कोटी रुपयांचा ढोबळ नफा मिळविल्याची माहिती दिली. गेल्या वर्षभरात बँकेच्या व्यवसायात तब्बल 27 टक्के वाढ झाल्याचे सांगत त्यांनी ग्राहक, सभासद आणि कर्मचारी यांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या सभेत कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक गिरीश तुळपुळे, विद्यमान अध्यक्ष नंदकुमार चाळके आणि संचालक मंडळ तसेच आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक सुरेश पाटील, अध्यक्ष अभिजीत पाटील आणि संचालक मंडळ, अधिकारी यांनी 1000 कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याचबरोबर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव या सभेत करण्यात आला. यामध्ये रायगड जिल्ह्यातील पहिला फ्लाईंग ऑफिसर कौस्तुभ मेहूल पाटील, आदर्श आणि प्रयोगशील शिक्षक राजेश रामचंद्र भोईर (पेण), आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेटपटू योगेश पेणकर (महाड), प्रगतशील शेतकरी मनोहर दत्तात्रेय पाटील, मंदार पाटील (अलिबाग), हर्षद साळवी (रोहा), शरीरसौष्ठवपटू प्रणव पुजारी (अलिबाग), कृषीभूषण प्रगतशील शेतकरी दिलीप भाऊ शिंदे (महाड), आरसीएफ एक्स एम्प्लॉयी सोशल फोरम आणि पर्यावरण संवर्धन संस्था ग्रीन अलिबाग यांचा समावेश होता. तसेच बँकेच्या ठेववाढीमध्ये उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल बँकेचे संचालक संतोष पाटील यांचादेखील विशेष सन्मान करण्यात आला.
अहवाल वर्षात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकेशी संलग्न पेझारी (अलिबाग), पाच्छापूर (पाली), कोप्रोली (पेण), वरंध (महाड), नेरळ (कर्जत) आणि गोसावीबुवा (तळा) या विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचाही यावेळी गौरव करण्यात आला. तसेच 36 वर्षे प्रामाणिक आणि उत्कृष्ट सेवा बजावणारे अधिकारी महेंद्र माळी आणि अहवाल सालात उत्कृष्ट कामगिरीबद्दल नवीन पनवेल शाखेच्या शाखाधिकारी निशा घरत यांचाही सभेत सन्मान करण्यात आला. सभेला सभासद, अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सभासदांचा विश्वास, पारदर्शक कारभार आणि आर्थिक शिस्त यांच्या बळावर सातत्याने प्रगतीची नवी शिखरे गाठली आहेत. 8,175 कोटींच्या व्यवसायानंतर आता 10 हजार कोटी व्यवसाय आणि 1,000 कोटी स्वनिधीचे लक्ष्य गाठण्याचा आमचा निर्धार आहे. शेतकरी, सभासद आणि सहकार क्षेत्राला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत रायगड बँक राज्यातील आदर्श सहकारी बँक म्हणून अधिक सक्षम करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
– जयंत पाटील, अध्यक्ष, आरडीसीसी
