बँकेचा नफा 87 कोटी; व्यवसाय 7,105 कोटींच्या पुढे
| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 2025-26 या आर्थिक वर्षाअखेर आपला एकूण व्यवसाय तब्बल 7105.33 कोटी इतका नोंदवित 87.15 कोटीचा ढोबळ नफा कमविला आहे. विशेष म्हणजे मागील आर्थिक वर्षात देखील बँकेचा नफा 80 कोटींपेक्षा अधिक होता. बँकेच्या इतिहासातील ही ऐतिहासिक वाढ असून बँकेच्या ठेवी 4037.14 कोटी तर एकूण कर्ज 3068.19 कोटी इतके झाले आहे. बँकेने आपल्या स्वनिधीचे आकडे सुद्धा जाहीर करताना तब्बल 777.10 कोटी इतक्या रकमेची नोंद स्वनिधी म्हणून केली आहे. गेल्या चार आर्थिक वर्षाचा कामगिरीचा आढावा लक्षात घेता बँकेने सन 2022 पासून 2026 पर्यंत एकूण व्यवसाय 3846.58 कोटी रुपयांवरून 7105.33 कोटी रुपयांपर्यंत वाढून सुमारे 85% वृद्धी बँकेने साध्य केली आहे.
विशेष म्हणजे, बँकेने 2025-26 हे आर्थिक वर्ष ‘डिपॉझिट ग्रोथ वर्ष’ म्हणून घोषित केले होते. आपली बँक या भावनेतून शेतकरी, उद्योजक, व्यापारी, स्वयंरोजगारधारक तसेच सर्वसामान्य बचतदार मोठ्या संख्येने या अभियानाशी जोडले गेले. स्थानिक पातळीवरील या विश्वासाच्या पायावरच बँकेची वाटचाल राज्याच्या सीमा ओलांडत देशपातळीवरील अग्रगण्य सहकारी बँकांमध्ये गणली जाऊ लागली आहे. रिझर्व्ह बँक व नाबार्ड सारख्या प्रमुख वित्तीय संस्थांकडून बँकेच्या कार्यपद्धतीची दखल घेतली जात असून, संस्था संगणकीकरण देशातील पहिली जिल्हा बँक आणि बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांना राज्य शासनाचा बेस्ट सीईओ पुरस्कार हे या आर्थिक वर्षातील बँकेच्या गौरवपूर्ण कामगिरीचे भाग राहिले.
याबाबत बँकेचे अध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, ग्राहकांचा विश्वास, संचालक मंडळाची दूरदृष्टी आणि कर्मचाऱ्यांची निष्ठा यामुळे बँकेने ही ऐतिहासिक कामगिरी साध्य केली आहे. ‘डिपॉझिट ग्रोथ वर्ष’ या संकल्पनेला मिळालेला प्रतिसाद हा केवळ आर्थिक यश नसून, तो बँक आणि ग्राहक यांच्यातील दृढ नात्याचे प्रतीक आहे. आगामी काळातही ग्राहककेंद्रित आणि विश्वासार्ह सेवा अधिक सक्षम करण्यावर आमचा भर राहील. तसेच, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी सांगितले की, तंत्रज्ञान, पारदर्शकता आणि वेगवान सेवा या त्रिसूत्रीवर आधारित कामकाजामुळे बँकेने सातत्याने प्रगती साधली आहे. वाढत्या ठेवी व कर्जवाटपामुळे बँकेचा आर्थिक पाया अधिक भक्कम झाला आहे. डिजिटल बँकिंग, कृषी वित्त आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्रावर लक्ष केंद्रित करत बँकेचा व्यवसाय मार्च 2028 पर्यंत 10,000 कोटींवर नेण्याबाबत खात्री त्यांनी व्यक्त केली.
आर्थिक कामगिरीबरोबरच बँकेने सेवा विस्तार आणि ग्राहककेंद्री उपक्रमांवरही तितकाच भर दिला आहे. डिजिटल माध्यमातून नव्या ग्राहकांना जोडण्याबरोबरच विद्यमान ग्राहकांसाठी अधिक आकर्षक व्याजदर व नाविन्यपूर्ण ठेव योजना राबविण्यात येत आहेत. पगारदार खातेदारांसाठी नुकताच 50 लाख रुपयांचा अपघाती विमा संरक्षणाचा निर्णय घेत बँकेने सामाजिक सुरक्षेच्या दिशेनेही पाऊल टाकले आहे. चालू आर्थिक वर्षात करण्यात आलेल्या नोकरभरतीमुळे शाखास्तरावरील मनुष्यबळ अधिक सक्षम झाले असून, ग्राहकांना अधिक वेगवान व गतिमान सेवा देणे शक्य झाले आहे. शासकीय योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीतही बँकेने पुढाकार घेतला असून, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत कर्जवाटप, ‘लाडकी बहीण’ योजनेत महिलांना मिळालेले आर्थिक सहकार्य तसेच ‘पीएम किसान’ योजनेद्वारे शेतकऱ्यांना थेट लाभ पोहोचविण्यात बँक महत्त्वाची भूमिका बजावत आहे. या सर्व उपक्रमांमुळे बँकेची केवळ आर्थिकच नव्हे, तर सामाजिक बांधिलकीही अधोरेखित होत आहे.
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार वर्तक यांनी बँकेच्या या प्रगतीमध्ये सहकारी पतसंस्थानी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे आभार व्यक्त करताना आगामी काळात डिजिटल विस्तार, ग्रामीण व शहरी भागातील आर्थिक समावेशन आणि उद्योग-शेती क्षेत्राला अधिक बळकटी तसेच ज्येष्ठ नागरिकांना सायबर सेक्युरिटी बाबत मार्गदर्शन मेळावे या दृष्टीने बँक वाटचाल करणार असून, ग्राहकांचा विश्वास आणि संचालक मंडळाची दूरदृष्टी यामुळे ही प्रगतीची घोडदौड पुढेही कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला.
