। अलिबाग । वार्ताहर ।
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी मंगळवारी (दि.15) अलिबाग तालुक्यातील चेंढरे येथील स्वामी समर्थ सार्वजनिक ग्रंथालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन व डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. दीप्ती जोशी कुलकर्णी यांनी ‘कविता कशी घडते’ व ‘कविता कशी पसंतीस उतरते’ याविषयी स्वरचित कवितांचे वाचन करुन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. श्रुती राजे यांनी ‘सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबूनी घ्यावे’ या विषयी सुंदर असे व्याख्यान केले. मराठी भाषा सौंदर्य व साहित्य या विविध विषयावर वक्त्यांशी संवाद साधला. कार्यक्रमात पाहुण्याचे स्वागत व आभार ग्रंथालयाचे अध्यक्ष दीपक कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रंथपाल दीप्ती कुलकर्णी व गुळवणी यांनी परिश्रम घेतले.







