तलाठी कार्यालयात मुलभूत सुविधांचा अभाव
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत तालुक्यातील कळंब मंडळ कार्यालयांतर्गत येणार्या वारे, कळंब, पोशीर, देवपाडा आणि सालोख या तलाठी सजेवर कार्यरत महिला कर्मचार्यांना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. शासकीय कार्यालयामध्ये मुलभूत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे कर्मचार्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. विशेषतः शौचालयाच्या अभावामुळे महिला कर्मचार्यांची कुचंबना होत आहे.
ग्रामीण आणि आदिवासी भागात असलेल्या या तलाठी कार्यालयांमध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधांची व्यवस्था नाही. कार्यालयात पिण्याचे पाणी, नागरिकांसाठी बैठक व्यवस्था, तसेच वीज पुरवठा यांसारख्या मूलभूत सुविधा देखील उपलब्ध नाहीत. यामुळे येथे कार्यरत कर्मचारी तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. काही महिन्यांपूर्वी या तलाठी कार्यालयाची नवीन इमारत बांधण्यात आली असली तरी शौचालयाची सोय करण्यात आलेली नाही. यामुळे महिला कर्मचार्यांना दिवसभर काम करताना शारीरिक आणि मानसिक त्रासाचा सामना करावा लागत आहे. महिला कर्मचारी व नागरिकांच्या सुविधेसाठी प्रशासनाने त्वरित पावले उचलणे आवश्यक आहे. शौचालयासारखी मूलभूत सुविधा नसणे हे प्रशासनाच्या दुर्लक्षाचे द्योतक आहे. यामुळे संबंधित विभागाने तातडीने आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणेे आवश्यक आहे.