प्रकल्पग्रस्त चिचंपाडा ग्रामस्थाकडून देखावा
| पनवेल । वार्ताहर ।
ग्रामीण भागात माणूस कसा जवळ होता. आता शहरी भागात मोबाईलच्या सवयीमुळे कसा दूर होत गेला याचा देखावा विमानतळ प्रकल्पबाधित विस्थापित झालेल्या चिंचपाडा गावातील ग्रामस्थांनी नवरात्रोत्सवात सादर करत जुन्या आठवणींचा ठेवा जपला आहे. विस्थापित झालेल्या आर टू या ठिकाणी वरमाता आई मंदिराच्यावतीने हा देखावा सादर केला आहे.
नवी मुंबई विमानतळ उभारताना जी गावे विस्थापित झाली आहेत त्यांना सिडकोने भूखंड देऊन तेथे इमारती उभ्या राहिल्या. गावाचे गावपण जाते की काय असा प्रश्न तेव्हा अनेकांना पडू लागला. पण गावपण अद्यापही जपले जात असल्याचे अनेकदा त्यांनी दाखवून दिले आहे. विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी जे आंदोलन उभे राहिले त्यावरून ते दिसून आले. सिडकोने ज्या गावात मंदिरे किंवा धार्मिक स्थळे होती त्यांना देखील भूखंड देऊन तेथे मंदिरे उभारली आहेत. त्यानिमित्त ग्रामस्थ त्याठिकाणी एकत्र येऊन सण उत्सव, धार्मिक कार्यक्रम साजरे करत असतात. पूर्वी गावात चावडीवर ज्येष्ठ मंडळी एकत्र येऊन गावातील निर्णय घेत. पाणवठ्यावर महिला वर्ग एकत्र येऊन घरातील धुनीभांडी करत. लहान मुले कधी घरी न बसता गावातल्या गल्लीत किंवा मोकळ्या जागेत निरनिराळे खेळ खेळत. ज्येष्ठाना आदर होता. मंदिरात धार्मिक उत्सव साजरे होत, दिंडया निघत यामुळेच नागरिक एकत्र येऊन विविध विषयांवर चर्चा होत असे.

त्यामुळे माणुसकीचा ओलावा कायम राहत होता. पण जस जसा विकास होत गेला हा ओलावा सुकत चालला आहे. शहरी भागात प्रत्येकाच्या हातात मोबाईल आला आणि सर्वजण माणुसकीच विसरून गेली आहेत. घरात सर्वजण मोबाईल घेऊन बसतात, हॉटेलमध्ये जेवताना सुद्धा मोबाईलकडे पाहत असतात, रस्ता ओलांडताना देखील मोबाइलमध्येच बघत असतात. या मोबाईलमुळे माणूस एकमेकांपासून दूर होत चालला आहे. ज्येष्ठाना घरी मान नाही तर त्यांना वृद्धाश्रमात पाठवले जाते. बगिच्यात गेले तरी मोबाईल लागतोच . मोबाईलमुळे माणसे कशी दूर होत गेली , गावात असताना कशी एकत्र होती असाच देखावा चिंचपाडा मधील काही ग्रामस्थांनी वरमाता आई मंदिराच्या नवरात उत्सवात सादर केला आहे. या देखाव्यात त्यांनी मराहिल्या त्या आठवणी म असे घोषवाक्य लिहून आपल्या आठवणींचा ठेवा आपण जपल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. या मंदिरातील नवरात्र उत्सवाचे हे 23 वे वर्ष असून कोरोना काळात त्यांना हा उत्सव साजरा करता आला नव्हता. यंदा हा उत्सव भव्य प्रमाणात साजरा केला जात असल्याचे सांगितले गेले.या देखाव्याची संकल्पना विजय केणी, प्रतीक भोईर, विजय भोईर यांची असून हा देखावा केला.