मायच्या निधनानंतरच सरकारचे डोळे उघडले

सिंधुताईंच्या जीवनावर आधारित धडा होणार
मुंबई | प्रतिनिधी |
ज्येष्ठ समाजसेविका,अनाथांच्या माय सिंधूताई सपकाळ यांच्या जीवनावर आधारित एक धडा शालेय अभ्यासक्रमात घेतला जाणार आहे. तसे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शालेय शिक्षण विभागाला दिलेले आहेत.
सिंधुताई सपकाळ यांच्या जीवन संघर्षावर कर्नाटकातील दहावीच्या अभ्यासक्रमात सिंधूताई यांच्यावर आधारित एक धडा आहे. मात्र महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेतली नाही ही खंत एका व्हिडिओमध्ये सिंधुताईंनी व्यक्त केली होती. ती क्लिप आता सर्वत्र व्हायरल होत आहे. महाराष्ट्रात मोठ व्हायचं असेल तर त्यासाठी मरावं लागतं आणि मेलेला माणूसच मोठा होतो तो महाराष्ट्र आहे असं मत या व्हिडिओमध्ये व्यक्त केलं आहे. मेल्यानंतर जिथं माणसं मोठी होतात तो महाराष्ट्र आहे हे दु:ख त्यांच्या बोलण्यातून दिसून आलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या गोष्टीची दखल घेतली असून, तसे निर्देश शिक्षण विभागाला दिले आहेत.
ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याची दखल घेण्याची सुचना शालेय शिक्षण विभागाला केली आहे व तसे एक पत्र शालेय शिक्षण विभागांच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांना पाठवले आहे. सिंधुताई सपकाळ यांच्या समाज कार्याचे आणि मानवतावादी दृष्टिकोनाचे धडे लवकरच शालेय अभ्यासक्रमात पहायला मिळतील असा आशावाद शिक्षकवर्गाकडून व्यक्त केला जातोय.

Exit mobile version