शालेय अभ्यासक्रमात आता कृषी विषय
रायगडातील बळीराजा आनंदित
अलिबाग | वैभव पाटील |
नव्या पिढीलाही शेतीची आवड निर्माण व्हावी, काळ्या मातीत त्यांच्या घामाचे थेंब पडावेत आणि ओसाड पडणारी शेती पुन्हा बहरावी या उद्दात हेतुने राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आता शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांसाठी कृषी हा विषय समाविष्ट करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.याचा निर्णयाचे रायगडातील शेतकरी वर्गातून स्वागत करण्यात येत आहे.आमची पोरही आदर्श शेतकरी बनतील असा आशावादही शेतकरी वर्गातून व्यक्त केला जात आहे.
कृषी या विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद यांनी संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करावा असा निर्णय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड आणि कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी घेतला.
सध्या राष्ट्रीय शिक्षणात कृषी शिक्षणाचा सहभाग 0.93 टक्के असून तो तीन टक्क्यांवर जाणे अपेक्षित आहे. कृषि विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केल्यास या प्रस्तावामुळे कृषी शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये ओढ निर्माण होईल त्याशिवाय शेतकर्यांविषयीची सामाजिक बांधिलकी निर्माण होतानाच ग्रामीण भागात कृषि संशोधक तयार होऊन संशोधनाला चालना मिळेल असे भुसे म्हणाले.
शेतीला गतवैभव आणि प्रतिष्ठा निर्माण करून देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश होणे आवश्यक आहे.असे मत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केले.
कृषी विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यामागे शेतकरी अणि शेतीप्रती कृतज्ञतेची भावना असून या अभ्यासक्रमात शेतीशी संबंधित विविध विषयांचा समावेश होणे आवश्यक आहे. पर्यावरणाचा समतोल राखण्याची गांभीर्यता विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याबरोबरच जैव तंत्रज्ञानावर आधारित शेतीला चालना देण्याची गरज विद्यार्थ्यांमध्ये या शिक्षणामुळे निर्माण होईल.असा दावाही या मंत्र्यांनी केला आहे.
शेती विषयक अभ्यासक्रमाचा शालेय शिक्षणात समावेश करणे ही चांगलीच गोष्ट आहे, शहरीकरण वाढल्यामुळे मुलांचा गावाकडे राहण्याचा कल कमी झाला आहे. या अभ्यासक्रमांचा समावेश झाला तर शेताकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलेल तसेच मुलांना शेतीची आवड निमार्ण होईल.
प्रदीप बैनाडे – तालुका कृषी अधिकारी अलिबाग
सध्या शेती ही खर्चिक बाब बनली असून त्यातून उत्पन्न कमी झाले आहे, त्यामुळे खेड्यातील शेतकरी शेती करण्या ऐवजी विकण्याकडे त्याचा कल जास्त आहे. या अभ्यासक्रमा मुळे मुलांना शेती विषयक ज्ञान मिऴेल व कमीत कमी पैशात शेतीचे उत्पन्न कसे वाढवता येईल हे शिकेल.
मधुकर म्हात्रे- शेतकरी परहुरपाडा