| ठाणे | प्रतिनिधी |
कल्याणमध्ये एका खासगी रुग्णालयात रिसेप्शनिस्ट मराठी तरुणीला परप्रांतीय तरुणाकडून बेदम मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाल झा असे आरोपीचे नाव असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
नांदिवलीतील एका खासगी रुग्णालयात पीडित तरुणी ही रिसेप्शनिस्ट म्हणून काम करते. गोपाल झा हा परप्रांतीय तरुण डॉक्टरांना भेटायला आला होता. यावेळी डॉक्टरांच्या केबिनमध्ये आधीच एमआर बसले होते. त्यामुळे डॉक्टरकडे एमआर बसले आहेत, तुम्ही जरा थांबा, असे तरुणीने आरोपीला सांगितले. यानंतर गोपालने तिच्याशी वाद घालायला सुरवात केली. यानंतर आरोपीने तरुणीच्या अंगावर धावून येत तिला लाथ मारली. तिच्या केसांना धरून तिला फरफटत नेत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गोकुळ झा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.







