। आगरदांडा । प्रतिनिधी ।
संपूर्ण जून महिना कोरडा गेला. मात्र जुलै महिन्यात वरुणराजाने दमदार हजेरी लावली आहे. महिन्याच्या पहिल्याच दिवसापासून मुरुड तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळला असून116 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत 839 मि.मी. पाऊस कोसळला आहे. पुढील पाच दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. रायगड जिल्ह्याज ऑरेंज अलर्ट जारी केला असून अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे होणारी संभाव्य परिस्थिती टाळण्यासाठी जिल्हात एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत.

प्रशासनाकडून सावधानतेचा व खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.तालुक्यात जोरदार पाऊस झाल्याने येथील जनजीवन विस्कळीत झाले. तालुक्यातील निसर्गरम्य छोटे-मोठे धबधबे प्रवाहित झाले आहेत. पावसाचा जोर वाढत आहे. शहरातील दत्तवाडी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. तर अनेक ठिकाणी शेतपिकात पाणी साचल्याने राब खराब होण्याची संभावना निर्माण झाली आहे. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट पुन्हा शेतकर्यांवर ओढू शकते. याशिवाय पावसाचा जोर वाढत नसल्याने नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.