मोरे गावदेवी मंदिराची अभिलेखात नोंद करा

आ. जयंत पाटील यांनी वेधले शासनाचे लक्ष
ग्रामस्थ मंडळ मोरे यांनी मानले आभार
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी हिवाळी अधिवशेनात मुरुड तालुक्यातील मोरे गावच्या गावदेवी मंदिराची अभिलेखात नोंद करण्यासाठी मुद्दा उपस्थित करुन सभागृहाचे लक्ष वेधले. त्यामुळे हा प्रश्‍न मार्गी लागण्याच्या समाधानातून ग्रामस्थ मंडळ मोरे यांनी शेतकरी भवन येथे आमदार जयंत पाटील यांची भेट घेत त्यांना धन्यवाद दिले.
यावेळी समाजचे अध्यक्ष गणेश नाक्ती, निलेश कासारे, नारायण ठाकूर, गणेश नाक्ती, भाऊ दिवेकर, रामकृष्ण ठाकूर, रमेश दिवेकर, मधुकर दिवेकर, सुभाष कासारे आदी उपस्थित होते. मुरुड तालुक्यातील मोरे येथील गावदेवी मंदिराची अभिलेखात नोंद करण्याकरिता मोरे ग्रामस्थ मंडळतार्फे शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील यांच्याकडे मोरे ग्रामस्थ मंडळ यांच्याकडून निवेदन सादर करण्यात आले होते. ग्रामस्थांच्या मागणीला अनुसरून सन 2021 च्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित करून आ. जयंत पाटील यांनी शासनाचे लक्ष वेधले व या विषयासंदर्भात अधिवेशनामध्ये मांडलेल्या प्रश्‍नाबाबतची चित्रफित सोशल माध्यमात सर्वत्र प्रसिद्ध झाली. तातडीने प्रशासनाकडून यासंदर्भात कारवाई सुरु करण्यात आली.
मागील काळात अतिवृष्टीमध्ये जंगल परिसरात असलेल्या या मंदिराची पडझड झाली. हे गावदेवी माता मंदिर मोरे गावाच्या आरक्षित वनक्षेत्रात प्राचीन काळापासून वसलेले एक प्राचीन प्रसिद्ध स्वयंभू स्वयंनिर्मित देवी मंदिर आहे. दर गुरुवार, शुक्रवार, पौर्णिमा, नवरात्र उत्सव, दीपावली, उन्हाळी सुट्टी आणि इतर अनेकप्रसंगी असंख्य भाविक मंदिराला भेट देतात. लहान क्षेत्रफळावर वसलेल्या या धार्मिक स्थळवर पुरेशा पायाभूत सुविधांची उपलब्धता नाही. भाविकांना होत असलेल्या त्रासामुळे समाजाने या मंदिराकरिता पायाभूत सुविधांचा विकास करण्याचे नियोजन केले होते; परंतु स्थानिक वनविभागाकडून या कामात काही कागदोपत्री अडचण झाल्याने हा प्रश्‍न मार्गी लावण्याकरिता मोरे ग्रामस्थांनी आ. जयंत पाटील यांची भेट घेत निवेदन दिले होते. त्या अनुषंगाने हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित करून जयंत पाटील यांनी शासनाचे लक्ष वेधले. याबद्दल ग्रामस्थांनी आ. पाटील यांचे पुष्पगुच्छ व आभार पत्र देऊन आभार मानले. यावेळी मोरे गावातील समाजाचे अध्यक्ष गणेश नाक्ती यांच्यासह शेकापचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version