सुपारीला यंदा विक्रमी भाव

दोन हजारांची घसघशीत वाढ; बागायतदारांमध्ये आनंदाचे वातावरण
मुरूड जंजिरा | वार्ताहर |
मुरुड तालुक्यातील शेकडो नारळ, सुपारी बागायतदारांना चक्रीवादळाचा अस्मानी संकटाचा फटका बसला आहे. दरम्यान, मुरुड तालुका सुपारी खरेदी व विक्री संघाने यावर्षीच्या असोली सुपारीला मागच्या वर्षापेक्षा जवळपास दोन हजारांची घसघशीत वाढ करुन विक्रमी भाव मिळवून दिल्याने ऐन गणेशोत्सवात सुपारी बागायतदार खूष झाले आहेत.
गतवर्षी, म्हणजेच सन 2019 ला एक मण (20 कि.ग्रॅ.) असोली सुपारीला 4120 रु. एवढा भाव लागला होता. परंतु, यावर्षी तो 6400 दर मणास एवढा विक्रमी लागला आहे. सुपारी संघाच्या असोली सुपारी हिशोबाची विशेष साधारण सभा नुकतीच संघाच्या सभागृहात घेण्यात आली. त्यावेळी संघाचे चेअरमन महेश भगत यांनी हा दर जाहीर केल्याने सुपारी बागायतदारांनी आनंद व्यक्त केला. सभेला सर्व संचालक मंडळ सदस्य व बागायतदार सभासद कोरोनाविषयीचे सर्व नियम पाळून उपस्थित होते.
मुरुड तालुक्यात सुपारी लागवडीचे क्षेत्र 450 हेक्टर असले तरी उत्पादन क्षेत्र 399 हेक्टर इतके आहे. मुरुडसह आगरदांडा, शिघ्रे, नांदगाव, चिकणी, भोईघर, काकळघर, मांडला आदी ठिकाणी सुपारी पिकवली जाते. गतवर्षी 725 खंडी (1 खंडी = 400 कि.ग्रॅ.)सुपारीचे माप संघात सभासदांनी घातले होते. तर, यावर्षीच्या निसर्ग चक्रीवादळात सुपारीची असंख्य झाडे जमीनदोस्त झाल्याने निम्मेच, म्हणजे 375 खंडीचे माप संघात पडले आहे.
पूर्वी ही सुपारी वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी पाठवली जायची. तेथील व्यापारी भावासंदर्भात कुचंबणा करीत असत. संघाला त्यांना साडेसहा टक्के दलाली द्यावी लागत असे. त्यामुळे भाव चांगला देता येत नव्हता; परंतु संघाने आपली वेबसाईट तयार केल्याने गुजरातमधील सूरत व अहमदाबाद येथील प्रक्रिया करणारे व्यापारी संघाला लाभले, त्यामुळे बागायतदार ते थेट व्यापारी अशा संबंधामुळे दलाली वाचल्याचा फायदा बागायतदारांना झाला असल्याचे महेश भगत यांनी यावेळी स्पष्ट केले.

Exit mobile version