चिरनेरमध्ये बासमती भाताचे विक्रमी उत्पादन

| चिरनेर | प्रतिनिधी |

उरण तालुक्यातील चिरनेर येथील एका शेतकर्‍याने बासमती भातपिकाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. एक एकराच्या क्षेत्रावर लागवड करण्यात आलेल्या भात शेतात त्यांनी तब्बल दोन खंडी दोन मण एवढ्या उत्पादनाचे भातपीक पिकविले आहे. संतोष बाळकृष्ण चिर्लेकर असे या शेतकर्‍याचे नाव असून, हा शेतकरी भातलागवडीबरोबर मळ्याचीही शेती करत आहे.

दरवर्षी ते आपल्या शेतात नवनवीन प्रयोग करत असून, यावर्षी त्यांनी बासमती हे भात पीक घेऊन उत्पादनात दुपटीपेक्षा अधिक वाढ केली आहे. दरवर्षी एका एकरात 15 ते 16 मण भात पिकविणार्‍या या शेतकर्‍याने यावर्षी बासमती भाताचे तब्बल बेचाळीस मण भातपीक पिकविले आहे. योग्यवेळी नांगरणी, चिखलणी, भात रोपांची लागवड व औषध फवारणी तसेच योग्य प्रमाणात खताची मात्रा करून त्यांनी हे विक्रमी पीक घेतले आहे.

दरवर्षीप्रमाणे त्यांनी भात बियाणे केंद्रातून हे बासमतीचे भात बियाणे खरेदी केले. या पिकाची यशस्वी लागवड करून, त्यांनी या भात पिकाचे विक्रमी उत्पादन घेतले आहे. दरवर्षी भात बियाणे बदलून शेतकर्‍यांनी भात लागवड करायला पाहिजे. त्यामुळे उत्पादनात नक्कीच वाढ होईल, असे ते म्हणाले. याआधी भात शेतीमध्ये आम्हाला या एका एकराच्या जागेत 15 ते 16 मण भात पिकत असे. मात्र, अलीकडे दरवर्षी आम्ही संकरित बियाण्यांचा वापर करत असल्यामुळे भात पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तालुक्यातील कृषी अधिकार्‍यांचा आम्ही सल्ला घेतो. त्यांनी सांगितलेल्या भात बियाणांचा तसेच औषधांचा आम्ही भातशेतीसाठी आणि मळ्याच्या शेतीसाठी वापर करतो, असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version