| माणगाव | प्रतिनिधी |
माणगाव तालुक्यातील दाखणे गावचे प्रगतशील शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य सीताराम उभारे, राम उभारे, मंगेश मुंढे, नरेश मुंढे या शेतकर्यांनी आपला संसार कुटंबासह शेतातच थाटला आहे. त्यांनी तब्बल 15 एकर जमिनीवर मशागत करून कलिंगड लागवड केली आहे. सध्या हे पीक काढणीसाठी तयार असून, विक्रमी उत्पादनामुळे तालुक्याला नवी ओळख मिळणार आहे. या शेतकर्यांच्या शेतावर जाऊन काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष पंकज तांबे यांनी त्यांचा सत्कार केला.
यावेळी शेतकरी मुकुंद वाढवळ, स्वप्नील शिर्के, संभाजी गायकवाड आदी उपस्थित होते. या शेतकर्यांनी कलिंगडाबरोबरच कारले पीक सात एकर जमिनीवर, मिरची एक एकर जमिनीवर, कोथिंबीर 10 गुंठे जमिनीवर केली आहे. पावसाळ्यानंतर जमिनीच्या मशागतीला सुरुवात केली असून, त्यांनी आपल्या शेतात 18,000 रुपये किलो दराने गोल्डन सिड बियाणे 52 हजार रुपये किमतीचे आणून 62 हजार कलिंगडाची रोपे नर्सरीत तयार केली आहेत. ही रोपे 20 दिवसांनंतर लावणीसाठी तयार झाली. 15 एकर जमिनीवर ड्रीप मनिंगबेडवर लावली. यासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च मशागतीसाठी, तर 100 गोणी खताचा वापर करण्यात आला. तसेच मजुरीसाठी दीड लाख रुपये, औषध फवारणीसाठी 20 हजार रुपये खर्च शेतकर्याला आला आहे. तीन महिन्यांचे कलिंगडाचे पीक असून, जानेवारीअखेरपर्यंत हे पीक विक्रीसाठी बाजारात पाठवण्याचा निश्चय केला होता. त्यानुसार हे पीक आता बाजारात विक्रीसाठी आले आहे.