काऊंटी स्पर्धेत विक्रमांचा पाऊस

। लंडन । वृत्तसंस्था ।

काऊंटी अजिंक्यपद स्पर्धेत लिसेस्टरशायरच्या लुईस किंबरने सामन्यादम्यान विक्रमांचा पाऊस पाडला आहे. इंग्लंडचा गोलंदाज ऑली रॉबिन्सन याच्या एका षटकात 43 धावा चोपणार्‍या किंबरने कौंटी अजिंक्यपद स्पर्धेतील वेगवान द्विशतकाचा विक्रम नावावर केला आहे. त्याने 100 चेंडूंत द्विशतक पूर्ण केले आणि प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे दुसरे वेगवान द्विशतक ठरले.

सामन्यात ससेक्सने पहिल्या डावात 442 धावांचा डोंगर उभा केला होता. लिसेस्टरशायरला पहिल्या डावात 275 धावाच करता आल्याने ससेक्सने 167 धावांची आघाडी घेतली. ससेक्सच्या सीन हंटने 4, तर रॉबिन्सनने तीन बळी घेतले होते. ससेक्सने दुसरा डाव 6 बाद 296 धावांवर घोषित करून 464 धावांचे लक्ष्य ठेवले होते. दुसर्‍या डावात ससेक्सकडून टॉम हायनेस (45), कार्टर (31), सीन हंट (65), अल्सोप (81) व जेम्स कोलेस (45) यांनी चांगली फलंदाजी केली. लिसेस्टरशायरचा संघ 7 बाद 175 धावा असा गडगडला. तेव्हा लुईस किंबर व बेन कॉक्स यांनी मोर्चा सांभाळला. लुईस किंबरने 100 चेंडूंत द्विशतक पूर्ण केले आणि काऊंटी अजिंक्यपद स्पर्धेतील हे वेगवान द्विशतक ठरले.

रॉबिन्सनचा नकोसा विक्रम
क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत काही मोजक्या खेळाडूंनी सहा चेंडूत सहा षटकार मारत 36 धावा काढल्याचे अनेकांनी पाहिले आणि ऐकले आहे. पण नुकताच क्रिकेटमध्ये एक इतिहास घडला आहे. इंग्लंडमध्ये चालू असलेल्या काऊंटी अजिंक्यपदाच्या एका सामन्यात एका षटकात तब्बल 43 धावा गोलंदाजांने खर्च केल्या आहेत, हा गोलंदाज म्हणजे इंग्लंडचा अष्टपैलू ऑली रॉबिन्सन. त्यामुळे त्याच्या नावावर नकोसा विक्रमही नोंदवला गेला आहे.
Exit mobile version