मुरुड तालुक्यात विक्रमी पाऊस

एका दिवसात 84 तर आज 60 मिलीमीटर पावसाची नोंद; भातशेती जलमय

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

मुरुड परिसरात गेली चार दिवस सतत धुवाधार पावसाची सुरुवात झाली तो पाऊस रात्रीदेखील मुसळधार पाऊस पडल्याने सर्वच ठिकाणी पाणीच पाणी झाले होते. आज सकाळी मुरुड तहसील कार्यालयाकडून पावसाची नोंद तपासण्यात आली तेव्हा 60 मिलीमीटर विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. फक्त एका दिवसात विक्रमी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस यामुळे विविध ठिकाणच्या रस्त्यावर पाणी साचले होते. पुढील तीन दिवस अजून वादळी पाऊस होणार असल्याने सुरक्षा म्हणून पावसामुळे शाळेला सुटी देण्यात आली. विविध ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली होती.प्रचंड प्रमाणात पावसाचे पाणी पडल्याने शेतीमध्ये सुद्धा पाणी साचले होते. मुरुड खरआंबोळी, शीघ्र, आगरदांडा, गारंबी परिसरातील भातशेती पाण्याखाली गेली. भातशेतीचे राब उशिरा लावल्याने राब पाण्यानी वाहून जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. तसेच समुद्राला मोठे उधाण असल्याने जंजिरा किल्ल्यासमोर उंच लाटा आदळत होत्या. खोरा बंदर लाटांचे तांडव पाहण्यासाठी पर्यटक व नागरिक हजेरी लावत होते.

सतत पाऊस असल्यामुळे बाजरपेठा ओस पडल्या होत्या. एसटी वाहतुकीलासुद्धा मोठा अडसर निर्माण झाला. कारण जागोजागी पाऊस तसेच पडलेले मोठं मोठे खड्डे याना सामना करून एसटी वाहतूक सुरु होती. समुद्र किनारीसुद्धा शुकशुकाट होता. आज या पडलेल्या पावसामुळे शेतकरी आनंदून गेला होता. मुरुड तालुक्यात आतापर्यंत एकूण पाऊस 1017 मिलीमीटर पाऊस पडला असून, सर्वात जास्त काल पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Exit mobile version