शिवकरच्या गुरचरणवर गावठाणची नोंद करा; आ.जयंत पाटील यांची मागणी

। मुंबई । प्रतिनिधी ।
पनवेल तालुक्यातील शिवकर येथील सर्व्हे नं. 1290 या गुरचरण वर्णनाच्या मिळकतीच्या 7/12 उतार्‍यावर गावठाण नोंद केली जावी, अशी मागणी शेकापचे आ.जयंत पाटील यांनी सरकाकडे केली आहे. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी हा मुद्दा उपस्थित करुन सरकारचे लक्ष वेधले. शिवकर गावाला सन 1938 साली आग लागून गाव बेचिराख झाल्याने सन 1941 ते 43 च्या दरम्यान जिल्हाधिकारी पुणे यांनी तेथील गुरचरण आणि वन जमीन क्षेत्रावर शिवकर गावाचा विस्तार करून पुढे कधीही आग लागणार नाही अशी योजना आखली. तसेच सर्व्हे नं. 129 गुरचरण क्षेत्र 8 हेक्टर आणि सर्व्हे नं. 59 वन क्षेत्र 4 हेक्टर त्याचबरोबर अन्य छोटे सर्वे नंबर असलेल्या जागेवर शिवकर गाव सुसज्ज बनविण्यात आले. मात्र आजपर्यंत सुंदर गाव 7/12 उतार्‍यावर गुरचरण नोंद आहे.

पनवेल तालुक्यात येत असलेल्या नैना प्रकल्पासाठी या जागेची मागणी करण्यात आली आहे. सदर 7/12 उतार्‍यावर गावठाण नोंद होण्यासाठी शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल ढवळे यांनी सन 2017, 2019, 2021 या आर्थिक वर्षात सलग उपोषण करून शासनाकडे दाद मागितली. वाढती लोकसंख्या विचारात घेता शिवकर येथील सव्हें नं. 1290 या गुरचरण वर्णनाच्या मिळकतीच्या 7/12 उतार्‍यावर गावठाण नोंद करण्यात यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.

Exit mobile version