यंदाच्या विश्वचषकात धावांची लयलूट..

विश्वचषकाचे अवघे 11 सामने संपलेत. पण भारताचे सामने वगळता इतरत्र धावांचा पाऊसच पडला. भारताने ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान या दोन बलाढ्य प्रतिस्पर्ध्यांना दोनशे धावसंख्याही गाठू दिली नाही. मात्र दक्षिण आफ्रिकेने सव्वाचारशे धावसंख्येचा पल्ला गाठून विश्वचषकातील नवा उच्चांक नोंदविला. एवढेच नव्हे तर मात्र विश्वचषकाने मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करून विजयी झालेले संघही पाहिले. एकाच डावात तिघांची शतके हा योग दुर्मिळ मानायचा की सामन्यातील चौघांची शतके कौतुकाने पहायची, याचाच विचार मनात येतो. विश्वचषकात असं कधी घडलं नव्हतं. भारत, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्या खेळाडूंनी विश्वचषकातील वेगवान शतके झळकाविली तर दक्षिण आफ्रिकेच्या ऐडन मार्करम याने विश्वचषकातील सर्वात वेगवान शतकाची नोंद केली. स्पर्धेला 11 दिवस होत नाही तोच तब्बल 12 शतकांची नोंद झाली देखील. ही धावांची लयलूट साधीसुधी नाही. तर वेगात काढलेल्या धावा आहेत. हाराकिरी नाही तर पद्धतशीर कुटलेल्या धावा आहेत. ही धावसंख्या नोंदविताना समोरचे प्रतिस्पर्धी साधेसुधेे नव्हते तर प्रतिथयश खेळाडू होते. त्यांचे सर्वोत्तम गोलंदाज गोलंदाजी करीत होते. आणि दिल्लीचा अपवाद वगळता मैदानांच्या सीमारेषा देखील वाजवीपेक्षा जवळ नव्हत्या. तरीही धावा कुटल्या गेल्या.

आत्तापर्यंतच्या विश्वचषकात असे कधीच घडले नव्हते. याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत. ट्वेन्टी-20 क्रिकेटने बाळसे धरेपर्यंत, गोलंदाजांची अशी कत्तल करणे फारच धाडसाचे मानले जायचे. आता ट्वेन्टी-20 क्रिकेटचा विश्वचषक व्हायला लागलाय. ट्वेन्टी-20 क्रिकेटच्या मलिकांचा तर देशोदेशी सुळसुळाट झालाय. आणि विश्वचषकात खेळणाऱ्या सर्वच संघांच्या प्रमुख खेळाडूंसाठी एकमेकांच्या देशांमधील मैदाने परकी राहिलेली नाहीत. एवढेच नव्हे तर विविध देशांचे खेळाडू आयपीएलमध्ये खेळतात. त्यांनी भारतीय खेळाडूंपेक्षाही भारतातील मैदाने अधिक परिचित आणि जवळची आहेत. कारण त्यांचे सरावाचे कॅम्पस्‌‍ येथेच होतात. अनेकांची होम ग्राऊंडस आहेत. त्यामुळे हे खेळाडू आपल्या देशाच्या मैदानाइतकेच भारतातील मैदानांशी, तेथील क्युरेटर्स, माळी यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवून आहेत. मैदानावर नेमके दव किता वाजता पडेल? किती पडेल? याची अचूक माहिती आता परदेशी खेळाडूंनाही आहे. त्यामुळे गोलंदाजी आणि फलदांजी व क्षेत्ररक्षण करताना अनेकदा हे परदेशी खेळाडू आणि त्यांचे अंदाज भारतीयांपेक्षाही अचूक निघाले आहेत. याचाच अर्थ असा आहे की, क्रिकेटमध्ये आता सिक्रेट असे काही राहिलेले नाही. प्रत्येकाचा या विश्वचषकात अभ्यास आधीपासून झाला आहे आणि तो अचूक आहे. प्रत्येक फलंदाजाचा भारतीय खेळपट्ट्यांचा अभ्यास झाला आहे. त्यामुळे पहिल्या 11 सामन्यातील प्रत्येकाची षटकामागील धावांची सरासरी एकत्र काढली तर ती आधीच्या सर्व विश्वचषकांपेक्षा दुप्पटीपेक्षा अधिक भरते. म्हणजे पाहा 2003, 2011 आणि 2015 या तीन विश्वचषकातील वैयक्तिक सरासरी धावसंख्या 5 होती. आता 11 सामन्यानंतरच ही वैयक्तिक सरासरी चक्क 12 वर पोहोचली आहे.

भारतातील बहुतांशी केंद्रावर पहिल्या डावादरम्यान प्रचंड उकाडा असतो. त्यावेळचे उन असह्य असते. मात्र, दुसऱ्या डावात फलंदाजी करताना सायंकाळी, अंधारून आले की उकाडा कमी कमी होत जातो. तासाभरानंतर दव पडायला लागले की चेंडू अधिक जड व्हायला लागतो. स्पीन आणि स्वींग कमी होतो. तेथेही फलंदाजांचा फायदा होतो. त्यामुळे सुरूवातीस फलंदाज बाद झाल्यानंतर फलंदाजांना बाद करणे हे मोठे आव्हानच होऊन बसते.बातमीदाखल भारताचा ऑस्ट्रेलियाविरूद्धचा डाव पहा. 3 बाद 2 अशा बिकट अवस्थेनंतर भारताने विजयासाठी आवश्यक असलेली 200 धावसंख्या आणखी अवघी एक विकेट गमावून गाठली. 97 धावांवर नाबाद राहिलेल्या राहुलने त्यावेळी सांगितले होते की रात्री चेंडू बॅटवर व्यवस्थित येत होता. त्यामुळे फलंदाजी करणे सोपे झाले. पाकिस्तानने श्रीलंकेचे 345 धावांचे आव्हानदेखील सहज पार केल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. एवढेच नव्हे तर न्यूझीलंड, भारत अन्य संघांनी धावांचा पाठलाग किती वेगात केला होता यावरून रात्री फलंदाजी करणे सोपे असल्याचे लक्षात येते.

Email: vinayakdalvi41@gmail.com

Exit mobile version