खाजगी सावकाराविरोधात गुन्हा
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
विनापरवाना खाजगी सावकारीला बंदी असतानाही व्याजाने पैसे देणार्या अलिबाग शहरातील सावकाराने व्याजाने दिलेल्या 50 हजारांपोटी 5 लाख 18 हजार पठाणी व्याज वसूल केल्यानंतरही राहिलेल्या दोन लाखांच्या मुद्दलीसाठी दमदाटी करणार्या खाजगी सावकाराविरोधात अलिबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर सावकार फरार असून अलिबाग पोलिस त्याचा शोध घेत आहेत. याबाबतचे वृत्त असे की, दि.14 नोव्हेंबर 2019 ते 25 सप्टेंबर 2021 च्या दरम्यान नितीन जगताप रा.ठीकरूळ नाका, अलिबाग हा त्याच्याकडे सावकारी व्याजाचे पैसे देण्याचा कोणताही परवाना नसताना अलिबाग शहरात बेकायदेशिररित्या व्याजाने पैसे देण्याचा व्यवसाय करतो. मुकेशसिंह भवानीसिंह राजपूत रा.तन्मय सोसायटी, मिर्चिगल्ली, पो. ता.अलिबाग यांना दुकानात माल भरण्यासाठी
पैशांची अत्यंत गरज असल्याने त्यांनी नितीन जगताप याच्याकडुन दि.25 डिसेंबर 2018 रोजी 11 टक्के व्याजाने 1 लाख रुपये घेतले होते. त्यासाठी त्यांनी दरमहा 11 हजार रुपये व्याज जगातप उकळत होता. तसेच दि.18 एप्रिल 2019 रोजी 50 हजार रु. 8 टक्के व्याजाने राजपूत यांनी घेतले होते. सदर संपूर्ण रक्कम 1 लाख 50 हजार रुपये राजपूत यांनी जगतापला परत केले होते. त्यानंतर पुन्हा राजपूत यांना आणखी पैशांची गरज असल्याने जगताप कडून परत 50 हजार रु व्याजाने घेतले. त्यापोटी त्यांनी व्याजासह एकुण 5 लाख 18 हजार रु. जगताप यांना दिले. असे असतानाही 50 हजारांसाठी जगताप याने आपली पठाणी वसूली सुरुच ठेवत राहीलेली मुददल 2 लाख रुपयाची मागणी सुुरु केली. त्यासाठी दमदाटी देत असल्याने राजपूत यांनी याबाबत अलिबाग पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार निगडे करीत आहेत.