। रायगड । प्रतिनिधी ।
भारत सरकारच्या संचार मंत्रालयांतर्गत कार्यरत असलेल्या रायगड डाक विभागामार्फत पोस्टल लाईफ इन्शुरन्ससाठी डायरेक्ट एजंट नियुक्त करण्यासाठी वॉक-इन मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. हे पद नियमित वेतनाधारित नसून, कार्य मोबदला आधारित आहे.
देशातील सर्वात जुनी आणि विश्वासार्ह सरकारी जीवन विमा योजना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोस्टल लाईफ इन्शुरन्स अंतर्गत कार्य करण्याची ही एक उत्तम संधी असून, समाजसेवेबरोबरच आकर्षक उत्पन्न मिळविण्याची संधी इच्छुकांना उपलब्ध होणार आहे. अत्यल्प हप्त्यात उत्कृष्ट विमा संरक्षण, ग्राहकांचा विश्वास, आकर्षक कमिशन व बोनस यामुळे पोस्टल लाईफ इन्शुरन्सची लोकप्रियता सातत्याने वाढत आहे. इच्छुक उमेदवारांनी किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक असून, बारावी अथवा पदवीधर उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल. समाजाभिमुख वृत्ती, लोकांशी संवाद साधण्याची क्षमता आणि विमा व्यवसायात काम करण्याची इच्छा असलेल्या महिला व पुरुष उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.
मुलाखतीस येताना उमेदवारांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्रे, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र सोबत आणावेत. निवड झाल्यानंतर उमेदवाराने स्वतःच्या नावाने 5,000 चे किसान विकास पत्र किंवा नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट सुरक्षा ठेव म्हणून सादर करणे आवश्यक राहील.वॉक-इन मुलाखत सोमवार, दि. 10 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत अधीक्षक डाकघर, रायगड डाक विभाग, अलीबाग यांच्या कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवती, स्वयंरोजगार करणारे, सामाजिक कार्यकर्ते, महिला बचत गट सदस्य तसेच विमा क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या सर्व पात्र व्यक्तींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन अधीक्षक डाकघर, रायगड डाक विभाग, अलीबाग यांनी केले आहे.
रायगड डाक विभागात भरती
