पावणेदोन लाख तक्रारींचे कल्याण परिमंडलात निवारण

। कल्याण । वार्ताहर ।

नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकारने ‘इझ ऑफ लिव्हिंग’ संकल्पना आणली आहे. यात वीजपुरवठा हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. त्यानुसार ग्राहकांना सुरळीत व दर्जेदार वीजपुरवठ्यासह सर्व सेवा तत्परतेने देण्याचे आदेश महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी कर्मचार्‍यांना दिले आहेत. त्यानुसार कल्याण परिमंडलाने गेल्या अडीच महिन्यात खंडित वीजपुरवठा, वीजबिल व इतर अशा 1 लाख 76 हजार 110 तक्रारींचे तातडीने निवारण केले आहे.

कल्याण परिमंडलात खंडित वीजपुरवठ्याच्या तक्रारींचे प्राधान्याने निराकरण करण्यात येत आहे. जून 2023 पासून आतापर्यंत वीजपुरवठा बंदच्या 1 लाख 26 हजार 481 तक्रारींचे निवारण करण्यात आले. वीजबिलाबाबतच्या 63 हजार 180 आणि इतर सेवाविषयक 6 हजार 816 तक्रारी सोडवण्यात आल्या. अडीच महिन्यात एकूण 1 लाख 76 हजार 373 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातील 1 लाख 76 हजार 110 तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यात आले. तर उर्वरित 263 तक्रारींचे प्राधान्याने निवारण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

कल्याण मंडल एक कार्यालयांतर्गत प्राप्त 65 हजार 103 तक्रारींपैकी 65 हजार 28, कल्याण मंडल दोन कार्यालयांतर्गत प्राप्त 38 हजार 737 तक्रारींपैकी 38 हजार 674, पालघर मंडलांतर्गत प्राप्त 19 हजार 761 तक्रारींपैकी 19 हजार 723 आणि वसई मंडलांतर्गत प्राप्त 52 हजार 772 तक्रारींपैकी 52 हजार 685 तक्रारी सोडवण्यात आल्या आहेत. मुख्य अभियंता औंढेकर हे वीज ग्राहकांच्या तक्रारी व त्यावर केलेल्या उपायांबाबत नियमित आढावा घेऊन आवश्यक सूचना देत आहेत.

Exit mobile version