आंबा पीकविम्याची वाढीव रक्कम कमी करा

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राज्यात आंबा पिकविम्याची वाढलेली रक्कम कमी करण्याची मागणी आ.जयंत पाटील यांच्यासह अन्य सदस्यानी केली आहे. या मुद्यावर त्यांनी आंबा पिकासाठीच्या विमा प्रीमियममध्ये झालेली वाढ कमी करावी अशी मागणी अध्यक्ष, महाराष्ट्र आंबा उत्पादक संघ यांनी कृषीमंत्र्यांकडे केली आहे. यांचेकडे केली आहे रायगड जिल्ह्यासाठी एका झाडासाठी रुपये 70/- हप्ता म्हणजे हेक्टरी रुपये 7000/- होता मात्र सन 2021-2022 पासून त्यात चौपटहून अधिक वाढ करण्यात आली असून त्यानुसार एका झाडासाठी रुपये 284/- म्हणजे हेक्टरी रुपये 29 हजार 400/- इतका करण्यात आला आहे तसेच रत्नागिरी जिल्ह्यासाठी हेक्टरी रुपये 13 हजार 500/- व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रुपये 13 हजार 300/- असा आहे.

रायगड जिल्ह्यासाठी वाढलेला आंबा पीक विमा हप्ता कमी करण्याबाबत जिल्हाधिकारी, रायगड यांनी आयुक्त, कृषि पुणे विभाग यांना दिलेल्या लेखी निवेदनानुसार कृषि आयुक्त, पुणे यांच्याबरोबर शेतकर्‍यांच्या झालेल्या बैठकीनंतरही पीक विमा हप्त्याची रक्कम कमी करण्यात आली नाही,याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने राज्यातील आंबा पीक विमा हप्त्याची रक्कम कमी करण्याबाबत कोणती उपाययोजना वा कार्यवाही केली वा करण्यात येत आहे.अशी विचारणा आ.जयंत पाटील यांनी केली.

यावर उपस्थित केले मुद्दे योग्य आणि खरे असल्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले. रायगड जिल्ह्यासाठी वाढलेला आंबा पीक विमा हप्ता कमी करण्याबाबत अध्यक्ष, महाराष्ट्र आंबा उत्पादक संघ व रायगड जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकरी यांचेसमवेत मा. आयुक्त, कृषि यांनी दिनांक 29 नोव्हेंबर, 2021 रोजी समक्ष चर्चा केली असून विमा हप्ता दर वाढीबाबत वस्तुस्थिती संबंधितांना अवगत केली आहे.असे नमूद केले आहे.

लांजा बस स्थानकाचे नूतनीकरण करा
लांजा (जि.रत्नागिरी) बस स्थानकाची इमारत नादुरुस्त व मोडकळीस आली असून प्रवाशांसाठी ती पुरेशी नसल्याने लांजा बस स्थानकाचे आधुनिकीकरण करुन अद्ययावत व प्रवाशांचे दृष्टीने सुसज्ज असे बस स्थानक उभारण्यात यावे, अशी मागणी आ.जयंत पाटील यांनी केली आहे. सदर बसस्थानकाच्या नूतनीकरणाच्या कामासाठी रुपये 1 कोटी 75 लाखांचा निधी शासनाने मंजूर केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्याचे तत्कालीन मा. पालकमंत्री यांच्या हस्ते माहे सप्टेंबर, 2019 मध्ये या इमारतीच्या कामाचे भूमिपूजन होऊन कामास सुरुवात झाली, तद्नंतर तीन वर्षे होऊनही बसस्थानकाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले नाही.

सदरहू कामाच्या कंत्राटदाराने केवळ तळाचा भाग बांधकाम करुन अर्धवट पिलर उभे केले आहेत, सदर पिलर वरील शिगांना गंज पकडला असून तीन वर्षे पावसात भिजून सर्वच बांधकाम निकामी झाले आहे तसेच सर्वत्र लहान लहान झुडपे उगवल्याने परिसराची दुरवस्था झाली आहे,असे जयंत पाटील यांनी सुचित केले आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बस स्थानकाची दुरवस्था झालेली आहे.मात्र तेथे प्रवाशांकरीता पिण्याचे पाणी व मूलभूत सुविधा उपलब्ध आहे. परंतु बसस्थानकात खड्ड्यांमुळे पावसाळयात पाणी साचते.

मोडीलिपी अभ्यासकाची नियुक्ती करा
मोडी लिपी येत असलेल्या अभ्यासकाची आवश्यकता असल्याने शासनाने तसे पद निर्माण करून संतोष शिंदे या मोडीलिपी अभ्यासकाची नेमणूक करावी,अशी मागणी आ.जयंत पाटील यांनी विशेष उल्लेखाद्वारे सभागृहात केली आहे. रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील मुरूड-जंजिरा संस्थानातील नवाब कालीन ऐतिहासिक राजवाड्यामध्ये, तसेच म्हसळा, श्रीवर्धन तालुक्यामध्ये मोडी लिपीत महत्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जागतिक करारांचे ऐवज इत्यादी सारखे दस्तऐवज (रेकॉर्ड) उपलब्ध आहे. सदरचा दस्तऐवज हा मोडी लिपीत असल्यामुळे तो अद्याप हाताळण्यात आलेला नाही.

यासाठी रायगड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील मोडी लिपीत असलेले ऐतिहासिक दस्तऐवजाचे अभ्यास करून त्याचे जतन करण्यासाठी मोडी लिपी येत असलेल्या अभ्यासकाची आवश्यकता असल्याने शासनाने तसे पद निर्माण करून अलिबाग तालुक्यातील रामराज येथील श्री. संतोष शिंदे या दलित मुलाने मोडीलिपीचा अभ्यासक करून विद्यापीठातून पदवी संपादन केलेली असून त्यांना त्या पदावर नेमणूक करून नोकरी देण्यात यावी अशी मागणी केली होती.परंतु श्री. संतोष शिंदे यांनी मोलीलिपी अभ्यासक म्हणून संबंधीत विभागास प्रस्ताव सादर करूनही त्यांना जाणूनबुजून नोकरी देण्यास दुर्लक्ष करण्यात येत आहे.असे त्यानी निदर्शनास आणले. ऐतिहासिक दस्तऐवजाचे अभ्यास करून त्याचे जतन करण्यासाठी मोडी लिपी येत असलेल्या अभ्यासकाची आवश्यकता असल्याने शासनाने तसे पद निर्माण करून. संतोष शिंदे यांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.

पुतळ्यांबाबत धोरण बदला
राज्यात कुठेही महापुरुषांचे पुतळे बसविताना जे धोरण ठरविण्यात आले आहे त्यात बदल केला जावा,अशी आग्रही मागणी आ.जयंत पाटील यांनी सभागृहात केली. या मुद्यावर बोलताना ते म्हणाले की नागरीकरण झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी महापुरुषांचे पुतळे बसवण्यात येत आहेत.मात्र त्यासाठी जी परवानगी दिली जाते त्यात खूप विलंब केला जात असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.याबाबत त्यांनी खालापूर येथे बसविण्यात आलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याबाबतचे उदाहरण दिले.या पुतळ्याच्या परवानगीसाठी तीन वेळा अर्ज केले होते.पण तीनही वेळा ते नामंजूर करण्यात आले.यासाठी पुतळे बसविण्यासाठी केंद्राचे आणि राज्याचे काय नियम आहेत याची माहिती सभागृहाला दिली जावी.शिवाय परवानगी देताना विलंब न करता ठराविक काळात देण्याची अट घातली जावी.मंजुरी दिली जाणार नसले तर ते सुद्धा कळविले जावे,अशी सुचना आ.जयंत पाटील यांनी यावेळी केली..

माणगाव बस स्थानकाची दुरवस्था
मुंबई -गोवा महामार्गा वरील माणगाव बस स्थानकाची खड्ड्यांमुळे दुरावस्था झाल्यामुळे प्रवाश्यांची अत्यंत हाल होत असल्याचे आ.जयंत पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले. या स्थानकाची इमारत जुन झाली असून स्लॅब कोसळण्याची घटना घड़ली आहे ,सुदैवाने त्यात प्रवासी दगावले नाही . बस स्थानक परिसरात पिण्याचे पाणी व मुलभूत सुविधा नसून सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे . तसेच पावसाळयात बस स्थानकाला तळ्याचे स्वरूप येत आहे.ही दुरावस्था कधी दूर करणार असा संतप्त सवाल शेका पक्षाचे जेष्ठ आमदार जयंत पाटिल यांनी आज विधान परिषदेत सरकारला विचारला.

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की जयंत पाटील यांनी सांगितलेली वस्तुस्थिति खरी आहे. मात्र प्रवाशां करीता पिण्याचे पाणी व मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे . माणगाव बस स्थानकाच्या वाहनतळाचे काँक्रिटीकरणाच े काम सुरू करण्यात आले आहे.

Exit mobile version