हवेतील प्रदूषणात घट

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल पालिका हद्दीतील हवेचा दर्जा सुधारला असून, बुधवारी (दि.22) हवा गुणवत्ता निर्देशांक 118 नोंदवला गेला आहे. झपाट्याने विकसित होत असलेल्या पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमान तळाच्या कामामुळे हवेमध्ये मोठ्या प्रमाणात धूळीकण मिसळून हवा प्रदूषण वाढत आहे. परिसरातील कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या वायूमुळे देखील या प्रदूषणात वाढ होत आहे. वायूप्रदूषण रोखण्याकरीता प्रशासनाने प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात होती. पालिकेकडून देखील हवेतील प्रदूषण रोखण्याकरिता पावले उचलण्यात येत असून, परिसरात विकास कामे करताना कमीतकमी धुळ प्रदूषण होईल याकरता उपाय योजना राबवण्याचे निर्देश आयुक्त देशमुख यांनी विकसकांना दिले होते.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने कळंबोली येथील उद्यानात हवेतील प्रदूषणाची मोजमाप करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आलेली होती. या यंत्रणेद्वारे लावण्यात आलेल्या फलकावर प्रदूषणाच्या मोजमापाचे प्रमाण दर्शवण्यात येत होते. काही दिवसापूर्वी मंगेश रानवडे यांनी रात्री केलेल्या पाहणीत प्रदूषणाचा निर्देशांक 330 इतका घातक दर्शवण्यात आला होता. आता मात्र निर्देशांकात सुधारणा झाली असून निर्देशांक 118 इतका दर्शवण्यात आल्याने हवेची गुणवंत्ता सुधारली आहे.

Exit mobile version