फसवणूक झालेल्या युवकाला दोन लाखाची रक्कम परत

| माणगाव | प्रतिनिधी |

पोलीस खात्यात भरती करतो असे सांगत दोन लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झालेल्या युवकाला त्याची दोन लाख रुपयांची रक्कम माणगाव पोलिसांनी पोलीस ठाणे येथे मंगळवार दि.11 ऑक्टोबर रोजी न्यायालयाच्या आदेशाने परत केली. पोलिसांनी याचा तत्परतेने प्रथम तपास लावून आपली रक्कम परत केल्याने फिर्यादी विराज विनोद सावंत रा.आंबेत ता.म्हसळा याने माणगाव पोलिसांचे विशेष आभार मानले.

विराज विनोद सावंत याला सुजित कृष्णा गोगावले रा.कामठे ता.पोलादपूर याने माझी वरिष्ठ अधिकार्‍यांशी चांगली ओळख आहे असे सांगितले. मी तुला पोलीस खात्यात भरती करतो त्यासाठी तत्परतेने आपल्याला दोन लाख रुपये भरायला लागतील असे सांगून माणगाव येथे विराज सावंत याने सुजित गोगावले यांस दोन लाख रुपये रोख रक्कम दिली. त्यानंतर आरोपीकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर सावंतने याबाबतची तक्रार माणगाव पोलीस ठाण्यात दिल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वर व सहकार्‍यांनी जलद गतीने या घटनेचा तपास लावून आरोपीला 4 सप्टेंबर 2022 रोजी ताब्यात घेऊन त्याच्याकडून 2 लाख रुपये जप्त करून सदरची 2 लाख रुपयांची रक्कम फिर्यादीला माणगाव पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या हस्ते न्यायालयाच्या आदेशाने परत देण्यात आले. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वर, महिला पोलीस हवालदार प्रीती ओम्ले, पोलीस शिपाई धोंडिबा गीते, पोलीस शिपाई रामनाथ डोईफोडे, पोलीस शिपाई अमोल पोंधे आदी उपस्थित होते.

Exit mobile version