| माणगाव | प्रतिनिधी |
सिडकोत नोकरी लावतो असे सांगत फिर्यादी यांना खोटे बनावट जॉइनिंग लेटर तयार करून ते फिर्यादीस देऊन 1 लाख 83 हजार 550 रुपयांची फसवणूक तीन आरोपींनी केली. हा गुन्हा दि.2 ऑगस्ट ते आजपर्यंत फिर्यादी यांच्या फोनवर तसेच माणगाव येथे समक्ष भेटून घडला. या घटनेची फिर्याद भावेश सुनील मोरे (26) रा.निजामपूर रोड, माणगाव यांनी (दि.11) माणगाव पोलीस ठाण्यात दिल्यावर यातील तीन आरोपींवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
दरम्यान, आरोपी संकेत अशोक मुंढे, रा. वाकडई नगर, ता. माणगाव, अनिकेत तांडेल, विनायक धोत्रे यांनी फिर्यादी भावेश मोरे यांना तुला सिडकोमध्ये नोकरी लावतो असे सांगून फिर्यादी यांना खोटे बनावट जॉइनिंग लेटर तयार करून दि.12 सप्टेंबर 2022 अशी जॉइनिंग तारीख टाकून दिले. तसेच फिर्यादी यांना कामाची नवीन फाईल तयार करतो त्यासाठी 40 हजार रुपये व फाईलवर साह्य करण्यासाठी 57 हजार रुपये, बॉण्ड बनविणेकामी 10 हजार रुपये अशी रक्कम तुला द्यावी लागेल, असे सांगून आरोपींनी स्वतः तसेच इतर लोकांच्या बँक पासबुकवर फिर्यादी यांच्याकडून रोख रक्कम व ऑनलाईन असे एकूण 1 लाख 83 हजार 550 रुपये घेऊन नोकरी न देता फिर्यादी यांची फसवणूक केली.
या गुन्ह्याची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात येऊन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वर हे करीत आहेत.