बेरोजगारांच्या जखमेवर मीठ चोळू नका
| अलिबाग | प्रतिनिधी |
प्रत्यक्षात शिक्षक भरती प्रक्रिया न करता, कंत्राटी स्वरुपात सेवानिवृत्त शिक्षकांची भरती करण्याचा घाट सरकारने घातला आहे. रायगड जिल्ह्यात 169 शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. डिएड झालेल्या बेरोजगार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न करू नका असे माजी आ. पंडित पाटील यांनी आक्रमक भूमिका घेत नियमित शिक्षक भरती कधी करणार असा सवाल उपस्थित केला.
कंत्राटी शिक्षक भरती करण्याची घोषणा सरकारने केल्यानंतर राज्यात बेरोजगार तरुणांनी नाराजी व्यक्त केली. त्या भरतीला विरोध केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही भरती करणार नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे काही महिने हे प्रकरण शांत झाले. मात्र बेरोजगारांना डावलून सरकारने पुन्हा कंत्राटी शिक्षक भरती सुरु केली आहे. राज्यामध्ये अनेक डीएडचे शिक्षण घेतलेले तरुण आहेत. सरकार शिक्षक भरती करण्यास उदासीन ठरत असल्याने नोकरीविना हजारो तरुण आहेत. तरीदेखील राज्य सरकारने पेन्शनधारक सेवानिवृत्त शिक्षकाची कंत्राटी स्वरुपात भरती केली.
रायगड जिल्ह्यात एकूण 169 सेवानिवृत्त शिक्षकांना घेण्यात आले आहे. केंद्र व राज्य सरकार इतर अनेक निर्णय झटपट घेतो.परंतु शिक्षक भरती प्रक्रियेत जाणीवपूर्वक विलंब करून गरीबांची मुले शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा कार्यक्रम या सरकारने केला आहे. ज्यावेळी सत्ताधारी विरोधक म्हणून असताना शिक्षक भरती तात्काळ करू असे आश्वासन देण्यात आले होते.पण शिक्षकांची भरती करण्यास सरकार का विलंब करीत आहे, असा संतप्त सवाल पंडित पाटील यांनी उपस्थित केला.
खोटं बोल पण रेटून बोल, हा सरकारचा कार्यक्रम आहे. जे बेरोजगार आहेत, ते नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. त्यांना नोकरी न देता निवृत्त शिक्षकांना परत सेवेत घेऊन बेरोजगार तरुणांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम विद्यमान सरकारने केले आहे, असेही पाटील म्हणाले.