लाखो लीटर रासायनिक सांडपाणी थेट नदीत
| चणेरा | प्रतिनिधी |
रोहा येथील धाटाव एमआयडीसीच्या कंपन्यांतील 22 लाख लीटर रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच थेट कुंडलिका नदीत सोडले जात आहे. दूषित व दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नदी काळवंडली असून, पाण्याला काळा रंग येऊन मासे मृत्युमुखी पडले आहेत. या पाण्याला दुर्गंधी असल्याने जनावरेदेखील पाणी पीत नाहीत. तसेच, पिकेदेखील धोक्यात आली असल्याने रोहा एमआयडीसीच्या सीईटीपी केंद्राची सखोल चौकशी करावी, अशी मागणी कुंभोशी, गोफणसह कुंडलिका नदीच्या पश्चिम खोऱ्यातील गावांतील शेतकऱ्यांनी केली आहे.
रोहा नगरपालिकेच्या मैलामिश्रित सांडपाण्यानंतर आता एमआयडीसीच्या रासायनिक सांडपाणी सोडले जात असल्याने कुंडलिकेच्या नशिबी आलेले भोग थांबण्याचे नाव घेत नाहीत. रोहा एमआयडीसी परिसरात 41 रासायनिक कारखाने आहेत. सांडपाणी प्रक्रिया केंद्रातून कुंडलिका नदीत सोडण्यासाठी गोफण बंदरापर्यंत टाकलेली पाइपलाइन कुंभोशी गावाजवळ नदीपात्रातच फुटली आहे. या पाइपलाइनमधून निघणारे केमिकलयुक्त घाणपाणी प्रक्रिया केलेले नसल्याचे निदर्शनास आले आहे. या दूषित पाण्याची प्रचंड दुर्गंधी सुटली असून, हे पाणी काळे पडले आहे. रोहा एमआयडीसीत वारंवार तक्रार करूनही यावर कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या दूषित पाण्यामुळे नदीकाठावरील विहिरी दूषित झाल्या असून, शेतजमिनीचा पोत खराब झाली असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. शेती नाही, रोजगार नाही अशा अवस्थेत जगायचं कसं, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.
रोहा एमआयडीसीतील अनेक कारखान्यांतून रासायनिक सांडपाणी बिनदिक्कतपणे कुंडलिका नदीत सोडले जात आहे. एकेकाळी जैवविविधतेने नटलेली कुंडलिका नदी रासायनिक प्रदूषणामुळे ‘बायोलॉजिकली डेड’ म्हणजेच ‘जैविकदृष्ट्या मृत’ झाली आहे. नदी वाचवण्यासाठी प्रशासनाने कारवाई करण्याची रोहा तालुक्यातील पर्यावरणप्रेमींची मागणी आहे.
पाइपलाइन कुंभोशीजवळ नदीपात्रात फुटल्यानंतर एमआयडीसी व रोहा इंडस्ट्रीज असोसिएशनने तातडीने तिची दुरुस्ती करणे आवश्यक होते. तसेच, दुरुस्ती होईपर्यंत सांडपाणी सोडणे बंद करायला हवे होते. परंतु, तसे न करता प्रक्रिया न केलेले केमिकलयुक्त घाण पाणी सोडून कुंडलिका नदी प्रदूषित केली आहे. सीईटीपी केंद्रातून सर्रासपणे प्रक्रिया न केलेले पाणी कुंडलिका नदीत सोडले जात असल्याचे या घटनेवरून सिद्ध झाले आहे. एमआयडीसीच्या सीईटीपी केंद्रावर सक्त कारवाई झाली पाहिजे.
नितीन परब,
अध्यक्ष, रोहा सिटीझन फोरम
रोहा एमआयडीसीच्या सीईटीपीमधील रासायनिक सांडपाणी कुंडलिका नदी दूषित करत असल्याबद्दल तक्रार प्राप्त झाली आहे. ती वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आली आहे. गोफणजवळ रसायनसदृश्य पाणी आढळून आले, ते प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. कार्यवाहीबाबतीत वरिष्ठ अधिकारी लवकरच निर्णय घेतील.
राजेश आवटी,
एस.आर.ओ. रायगड -2, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ